बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे भाग ३ buddh....

                बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे 


                हिंदू धर्मामध्ये राहून कोणाचा काहीही उद्धार होणार नाही. हिंदू धर्म रचनेप्रमाणे वरिष्ठ वर्णांना व जातींना फायदे आहेत हे खरे आहे,पण इतरांचे काय ?ब्राह्मण बाई बाळंतीण झाली की, तिची नजर हायकोर्ट जज्जाची जागा कोठे रिकामी आहे त्याकडे आणि आमची झाडूवाली बाई बाळंतीण झाली तर तिची नजर कोठे झाडूवाल्याची जागा रिकामी आहे तिकडे असते. अशी विचित्र रचना हिंदू धर्माच्या वर्णव्यवस्थेने केलेली आहे. यातून सुधारणा ती काय होणार? उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल. 

                    बौद्ध धर्मात ७५ टक्के ब्राह्मण भिक्षु होते व २५ टक्के शूद्रादी होते. परंतु तथागतांनी सांगितले “हे भिख्खुहो,तुम्ही निरनिराळ्या देशातून व जातीतून आला आहात. आपल्या प्रदेशातून नद्या वाहतात तेव्हा त्या पृथक पृथक असतात,मात्र त्या सागरास मिळाल्या की, त्या पृथक राहात नाहीत.एकजीव व समान होतात. बौद्ध संघ हा सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व समान. सागरात गेल्यावर हे गंगेचे पाणी किंवा हे महानदीचे पाणी असे ओळखणे अशक्य असते. त्याप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात,अशी समता सांगणारा एकच महापुरुष आहे आणि तो महापुरूष म्हणजे भगवान बुद्ध होय”.( प्रचंड टाळ्या ) काही लोक असे म्हणतात, तुम्ही धर्मांतर करण्यास इतका अवधी का लावला? इतके दिवस काय करीत होता हा प्रश्न महत्त्वाचा आहे पण धर्म पटवून देणे हे काम सोपे नाही. ते एका माणसाचे काम नाही. धर्माबाबत विचार करणाऱ्या कोणत्याही माणसास हे समजून येईल. माझ्यावर जेवढी जबाबदारी आहे,तेवढी जबाबदारी जगातील कोणत्याही माणसावर नाही. मला अधिक आयुष्य लाभल्यास मी योजलेले कार्य पूर्ण करीन.                                                                     ( डॉ.बाबासाहेब चिरायू होवोतच्या घोषणा व निनाद . ) 

                          महार बौद्ध झाले तर काय होईल, असे काही लोक म्हणतील असे त्यांनी म्हणू नये, असे माझे त्यांना सांगणे आहे. ते त्यांना धोकादायक होईल. वरिष्ठ व संपत्तीवान वर्गाला धर्माची आवश्यकता वाटणार नाही. त्यांच्यामधील अधिकारावर असलेल्या साहेब लोकांना राहाण्यास बंगला आहेत्यांची सेवा करावयास नोकर चाकर आहेत,त्यांना धन संपत्ती आहे,मानमरातब आहे,अशा माणसांना धर्माबद्दल विचार अगर चिंता करण्याचे कारण नाही. 

                     धर्माची आवश्यकता गरिबांना आहे . पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर. जीवनाचे मूळ आशेत आहे. आशाच नष्ट झाली तर जीवनाचे कसे होईल? धर्म आशादायी बनवितो,व पीडितांना,गरिबांना संदेश देतो काही घाबरू नकोस,जीवन आशादायी होईल. म्हणून गरीब व पीडित मनुष्यमात्र धर्माला चिकटून राहातो. 

                      जेव्हा युरोपमध्ये ख्रिस्ती धर्म शिरला त्यावेळी रोमची व आसपासच्या देशाची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. लोकांना पोटभर जेवणही मिळाले नाही, त्यावेळी गरीब लोकांना खिचडी वाटण्यात येत असे. त्यावेळी ख्रिस्ताचे अनुयायी कोण झाले? गरीब पिडलेले लोकच झाले. युरोपमधील सर्व गरीब व कनिष्ठ जनता खिस्ती बनली. हा खिश्चन धर्म भीक मागणाऱ्यांचा आहे,असे गिबनने म्हटले होते. ख्रिस्ती धर्म हा युरोपमध्ये सर्वांचा धर्म कसा झाला, याचे उत्तर द्यावयास गिबन हयात नाही, नाहीतर याचेही उत्तर त्याला द्यावे लागले असते, काही लोक असे म्हणतील, हा बौद्ध धर्म महारड्या - मांगांचा धर्म आहे. 

                        ब्राह्मण लोक भगवंताला ' भो गौतम म्हणजे ' अरे गौतम ' असे म्हणत असत. ब्राह्मण बुद्धाला असे हिणवीत - चिडवीत असत. पण राम, कृष्ण, शंकर यांच्या मूर्ती परदेशात विकावयास ठेवल्या तर किती खपतील ते पाहावे, पण बुद्धाची मूर्ती ठेवली तर एकही मूर्ती शिल्लक राहाणार नाही. ....     ( टाळ्यांचा कडकडाट ) आता घरातल्या घरात ( भारतात ) हे पुष्कळ झालं, बाहेर काही दाखवा, जगात नाव जाहीर आहे ते फक्त बुद्धाचेच ! तेव्हा या धर्माचा प्रसार झाल्याशिवाय कसा राहील

                   आमच्या वाटेने आम्ही जाऊ,तुमच्या वाटेने तुम्ही जावे. आम्हाला नवीन वाट मिळाली आहे. हा आशेचा दिवस आहे. हा अभ्युदयाचा,उत्कर्षाचा मार्ग आहे. हा मार्ग काही नवीन नाही. हा मार्ग कोठून आणलेला नाही . हा मार्ग इथलाच आहे . भारतातीलच आहे. या देशामध्ये २००० वर्षे बौद्ध धर्म होता. खरे म्हणजे,या पूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाही याचीच आम्हाला खंत वाटते. भगवान बुद्धाने सांगितलेली तत्त्वे अजरामर आहेत. पण बुद्धाने मात्र तसा दावा केलेला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.                     

                     बौद्ध धर्माचा नाश झाला याचे मुख्य कारण मुसलमानांच्या स्वाऱ्या हे होय. मुसलमानांनी स्वाऱ्यांमध्ये बौद्ध  मूर्ती फोडून टाकल्या,बौद्ध धर्मावर यामुळे पहिले आक्रमण झाले. त्यांच्या स्वाऱ्यांना भिऊन बौद्ध भिख्खु नाहीसे झाले. कोणी तिबेटला गेले, कोणी चीनला गेले,कोणी कोठे गेले ! धर्माचे संरक्षण करण्यासाठी उपासक लोक हवे असतात. वायव्य सरहद्द प्रांतात एक ग्रीक राजा होता. त्याचे नाव मिलिंद. हा राजा सदोदीत वादविवाद करीत असे. वादविवादाची त्यास मोठी आवड होती. वादविवादपटू असेल त्याने येऊन वादविवाद करावा असे त्यांनी आव्हान केले होते. त्यांने अनेक  हिंदु विद्वानांना  वादविवादात निरूत्तर केले होते. 

                       एकदा त्याला बौद्ध लोकांबरोबर वादविवाद करावा असे वाटले व वादविवादपटू कोणी बौद्ध असल्यास त्यास घेऊन यावे असे त्याने सांगितले. तेव्हा बौद्ध लोकांनी नागसेनास विनंती केली की तुम्ही या वादविवादात बौद्ध जनांची बाजू मांडावी. नागसेन विद्वान होता. तो पूर्वीचा ब्राह्मण होता. नागसेनाचा व मिलिंदचा जो वादविवाद झाला तो पुस्तक रूपाने जगाला माहीत आहे . त्या पुस्तकाचे नाव' मिलिंद पन्ह ' आहे . मिलिंदाने असा प्रश्न विचारला की धर्मास ग्लानी का येते ? नागसेनाने त्याचे उत्तर देऊन त्याची तीन कारणे सांगितली. 

१ ) पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो . त्या धर्माच्या मूळ तत्त्वात गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व काळापुरता असा धर्म टिकतो . 

२ ) दुसरे कारण हे की धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्मग्लानी होते. ज्ञानी माणसांनी धर्म - ज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते. 

३ ) तिसरे कारण हे की धर्म व धर्माची तत्त्वे विद्वानासाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे- देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतीचे पूजन करतात. 

                  आपण बौद्ध धर्म स्वीकारताना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजेत. बौद्ध धर्माची तत्त्वे कालिक, काही कालापुरती आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही. आज दोन हजार पाचशे वर्षानंतरही बुद्धाची सारी तत्त्वे सर्व जग मानते . अमेरिकेमध्ये बुद्धाच्या दोन हजार संस्था आहेत . इंग्लंडमध्ये तीन लाख रुपये खर्च करून बौद्ध मंदीर बांधण्यात आले आहे. जर्मनीतही तीन , चार हजार बौद्ध संस्था आहेत . बुद्धाची तत्त्वे अजरामर आहेत . तथापि बुद्धानी असा दावा केला नाही की हा धर्म ईश्वराचा आहे . बुद्धानी सांगितले माझे वडील प्राकृत होते ; माझी आई प्राकृत बाई होती. हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा. हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा तो तुम्ही स्वीकारा . एवढी उदारता दुसऱ्या कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही. 

                      बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे ? इतर धर्मात व बौद्ध धर्मात फार फरक आहे. इतर धर्मात बदल हा घडून यावयाचा नाही, कारण मनुष्य व ईश्वर यांचा संबंध ते धर्म सांगतात. इतर धर्माचे म्हणणे असे की ईश्वराने सृष्टी निर्माण केली. ईश्वराने आकाश , वायु , चंद्र , सूर्य सर्व काही निर्माण केले. आम्हाला ईश्वराने काहीही करावयाचे शिल्लक ठेवले नाही, म्हणून ईश्वरास भजावे ! ख्रिस्ती धर्माप्रमाणे तर मृत्यूनंतर एक निर्णयाचा दिवस Day of Judgement असतो व त्या निर्णयाप्रमाणे सर्व काही घडते . देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही. भगवान बुद्धानी सांगितले, जगात सर्वत्र दुःख आहे .९ ० टक्के माणसे दुःखाने पिडलेली आहेत. त्या दु खातून पिडलेल्या, गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे.

                       बंधुंनो,मला सांगावयाचे होते ते सांगितले. हा धर्म सर्वतोपरी परिपूर्ण आहे. त्यास लांच्छन कोठेच नाही. हिंदू धर्माची अशी काही तत्त्वप्रणाली आहे की त्यामधून उत्साहच निर्माण होऊ शकत नाही. हजारो वर्षांपासून परवापर्यंत आपल्या समाजामधून एकही मनुष्य ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही. मला सांगावयास हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती. ती मराठा होती. ती मला शिवत नसे . माझी आई मला सांगत असे की मोठ्या माणसास मामा म्हणत जा. पोस्टमनला मी मामा म्हणत असे . ( प्रचंड हंशा ) लहानपणी शाळेत असताना मला तहान लागली होती. मी मास्तरांना तसे सांगितले. मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरिता चपराशाला दुसरीकडून बोलाविले व याला नळावर ने असे सांगितले. आम्ही नळावर गेलो. चपराशाने मग नळ सुरू केला व मी पाणी प्यालो. मला शाळेत पाणी प्यावयास मिळत नसे. पुढे मला डिस्ट्रिक्ट जज्जाची नोकरी देऊ केली पण ती घोरपड मी गळ्यात बांधून घेतली नाही. माझ्या बांधवांचे कार्य मग कोण करील, असे माझ्यापुढे कोडे होते, म्हणून मी नोकरीच्या बंधनात अडकलो नाही. 

                      मला वैयक्तिकरित्या या देशातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ( टाळ्या ) तुमच्या डोक्यावर वैश्य , क्षत्रिय , ब्राह्मण अशी जी उतरंड रचली आहे ती कशी उलटेल व मोडेल हा खरा प्रश्न आहे. म्हणून या धर्माचे ज्ञान सर्वप्रकारे तुम्हाला करून देणे हे माझे कर्तव्य आहे . मी पुस्तके लिहून तुमच्या शंका कुशंका दूर व ज्ञानाच्या पूर्णावस्थेला तुम्हास नेण्याचे सर्व प्रयत्न करीन. आज तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून वागले पाहिजे.  तुमचीही जबाबदारी मोठी आहे . तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. 

                      बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत् आहे . म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे होऊ नये आपण दृढनिश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू. कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता राहाणार नाही. हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प केला आहे. काही इच्छिलेले आहे, हे तरुणांनी लक्षात घ्यावे. त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा निदान २० वा हिस्सा या कामी देईन, असा निश्चय करावा . मला सर्वांना बरोबर न्यावयाचे आहे. प्रथम तथागताने काही व्यक्तींना दीक्षा दिली व त्यांना या धर्माचा प्रचार करा असा आदेश दिला. त्याप्रमाणे पुढे यश व त्याच्या ४० मित्रांनी बौद्ध दीक्षा घेतली. यश श्रीमंत घराण्यातील होता. त्यांना भगवंताने सांगितले, हा धर्म कसा आहे ? यश हा तर बहुजन हिताय बहुजन सुखाय ,लोकानुकंपाय, धम्म आदि कल्याणं, मध्य कल्याणं,पर्यावसान कल्याणं त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे तथागताने आपल्या धर्माच्या प्रचाराचा मार्ग तयार केला.आता आपणालाही यंत्रणा तयार करावी लागेल म्हणून समारंभानंतर  प्रत्येकाने प्रत्येकाला  दीक्षा द्यावी. प्रत्येक  बौद्ध माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असे मी जाहीर करतो .

क्रमश: भाग 3................

      

            शब्दांकन

आयु.भास्कर गायकवाड

   ९८५०२४७६२१

             आभार

आयु.  डॉ.सुरेश कोरे साहेब


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.