ज्यांच्या हाती सामाजिक सत्ता,त्यांच्याच हाती राजकीय सत्ता........

ज्यांच्या हाती सामाजिक सत्ता,त्यांच्याच हाती राजकीय सत्ता........

३१ जुलै १९३७ - धुळे महाराष्ट्र

             


 
१ ऑगस्ट रोजी गुढीपाडव्याप्रमाणे स्वराज्याचा प्रारंभ दिन म्हणून साजरा करावा
असे काँग्रेसने फर्माविले आहे . काँग्रेस पक्षानी राज्यकारभाराची सूत्रे हातात घेतली म्हणून ते स्वराज्य झाले आणि आमच्यासारख्याने कोणी दिवाणपद घेतले तर मात्र ते स्वराज्य नव्हे  हे म्हणणे योग्य आहे काय? भावना व तत्त्वज्ञान क्षणभर बाजूला ठेवून व्यवहारी दृष्टीने विचार केला तर असे दिसून येईल की गळे कापणारे सावकार , मजुरांना नडणारे गिरण्यांचे मालक व आपल्याला अन्य तऱ्हेने  त्रास देणारे जमीनदार लोक , पाटील लोक हे सर्व  लोक जसे होते तसेच या देशात राहणार आहेत. इंग्रज लोक निघून गेले तरी हे लोक कायम राहणार आहेत. म्हणून पूर्वीपेक्षाही आपणाला जास्त चिंता बाळगली पाहिजे. इतके दिवस एक गोष्ट आम्हाला पोषक होती. ती अशी की, इंग्रज  जातीविषयक भावना व स्पृश्यास्पृश्य विचार पाहात नव्हते. यापुढे तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता गेली आहे . आता आपल्या लोकांची दाद घेणार तरी कोण ? हे स्वराज्य नसून इतर लोकांचे आमच्यावर राज्य होणार आहे. म्हणून संघटन करणे हे तुमचे कर्तव्य आहे . संघटन न केल्यास तुमची दैना शतपट होईल.

                   आज दलीतावर  जुलूम झाला तर पाटील, शिपाई , मामलेदार कोणी त्या मदत करीत नाही. इतकेच नव्हे तर एक दलीतही दुसऱ्या दलिताला मदत करीत नाही . म्हणून जातीय संघटन अवश्य करा. अन्यायाच्या वेळी तरी त्याला मदत करा. पैशाशिवाय काही काम होत नाही . वकील , साक्षीदार , कोर्टाची प्रोसेस , मोटारचे भाडे या सर्व गोष्टींना पैसा लागतो . सबब न्याय मिळविण्यासाठी जातीचा फंड उभारा . एका गावात प्रयत्न करून तुम्ही न्याय मिळविला तर त्याची दहशत इतर गावावर पडेल. तुमचे काम दुसऱ्याने करावे , अशी अपेक्षा का करता ? तुमच्यासाठी श्री. बर्वे यांनी छात्रालय काढावे किंवा गांधींनी काढावे असे का ?प्रत्येकाने एक रुपया दिला तर दहा लाखाचा फंड जमा होईल. इंग्रज आता काही करू शकत नाही. याचे मी उदाहरण देतो . मंत्रीमंडळात होता होईल तो अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधी घ्यावेत, असे बादशहाने गव्हर्नरला दिलेल्या आज्ञापत्रिकेत म्हटले आहे . हल्लीचे मंत्रीमंडळ गांधींच्या सांगण्यावरून तयार झाले . मुंबईच्या मंत्रीमंडळात महार - मांगांचा एकही प्रतिनिधी नाही तरी पण गव्हर्नराने त्यात हात घातला नाही. मी काँग्रेसला का मिळालो नाही?असा प्रश्न काही लोक विचारतात. त्याची कारणे अशी आहेत : --

( १ ) काँग्रेसच्या राजकारणात जर काही निष्पन्न झाले असेल तर ब्राह्मण्याचा उदय झाला एवढेच मला दिसते . सहा प्रांतात कोण लोक दिवाण झाले ते पाहा . २२मुख्य प्रधान झाले आहेत. साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य हजारोपट वाईट आहे .

 ( २ ) मी अस्पृश्यांकरता जी चळवळ करतो ती बंद करा असे मला सांगण्यात येते, परंतु मला पगाराची मातब्बरी नाही किंवा मान मिळविण्याचीही  पर्वा नाही .

                तुम्ही लोकांनी स्वाभिमानी बनावे हीच माझी आकांक्षा आहे व त्याकरता स्वतंत्र चळवळ करणे  आवश्यक  आहे . तुमच्यात व माझ्यात फरक एवढाच की तुमच्यापेक्षा मला जास्त ज्ञान आहे. म्हणून मी जास्त पाहू शकतो व धोका कोठे आहे . हे मला समजते . काँग्रेसच्या लोकांनी काहीही म्हटले तरी मला त्याची पर्वा नाही . तुम्ही माणसे झालात म्हणजे माझे श्रम सफल झाले . हे स्वराज्य धोकादायक आहे. ज्यांच्या हाती सामाजिक सत्ता होती त्यांच्याच हाती राजकीय सत्ताही गेली आहे. आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाची पंधरा माणसे मुंबईच्या असेंब्लीत आहेत . ही माणसे एका दावणीत पक्की बांधलेली आहेत . एकाचे तोंड एकीकडे व दुसऱ्याचे दुसरीकडे असे नाही. यामुळे काँग्रेस पक्षाला कोणाची भीती वाटत असेल तर ती आमच्या पक्षाची आहे .

                 काँग्रेस पक्षाला मुसलमानांची भीती वाटत नाही किंवा लोकशाही पक्षाची भीती वाटत नाही. ही गोष्ट वल्लभभाई यांनी पुणे येथे जे भाषण केले त्यात उघड झाली. आपण निवडणुकीच्या वेळी संघटनेने वागलो म्हणून हे आपल्या फळ मिळाले. निवडणुकीच्यावेळी जी शपथ घेतली ती कायम ठेवा. संस्थेची शाखा प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केली पाहिजे . वरून मदत करणारा दाता कोणी नाही , जो कष्ट करील त्याची सत्ता असते . प्रत्येक संस्थेत आपली जास्त माणसे जातील, अशी एकजुटीने खटपट करा. काँग्रेसला हरिजनांची दया असती तर कोणतीही शर्त न घालता एखादा हरिजन त्यांनी मंत्रीमंडळात घेतला नसता काय? पण यासाठी आपण कोणाजवळ भिक्षा मागू नये. मी काँग्रेसच्या मंडळीशी कधी मसलत केली नाही . सव्वा मैल दूर राहिलो. खानदेशात आपल्या पक्षाचे श्री. दौलत गुलाजी जाधव हे निवडून आलेले आहेत त्यांच्याकडून काम करवून घ्या . या देशात आपणाला माणुसकीने वागवीत नाहीत ही गोष्ट तुम्ही विसरता,परंतु मी कधीच विसरू शकत नाही. सतत जागृत राहा म्हणजे यश मिळेल.

संदर्भ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग २ पान नं ३१ ते ३७

       

          शब्दांकन

आयु.भास्कर गायकवाड

   ९८५०२४७६२१

             आभार

आयु.  डॉ.सुरेश कोरे साहेब

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.