बाबासाहेबांचे बालपण आणि शिक्षण
बाबासाहेबांचे बालपण आणि शिक्षण
पूर्वज
बाबासाहेबांचा जन्म रामजी महू येथे असताना १४ एप्रिल १८९१ ला झाला. त्यांना सर्वजण भिवा किंवा भीमराव म्हणत असत. बाबासाहेब सहा वर्षांचे असताना भीमाबाईंचे निधन झाले आणि आईचे छत्र हरपले. निवृत्त झाल्यावर रामजी आपल्या कुटुंबाला घेऊन काप-दापोली येथे स्थायिक झाले. भजन, नामसंकीर्तन या गोष्टी घरात रोजच्या दिनचर्येचा भाग होत्या. बाबासाहेबांच्या आत्या आता रामजींच्या परिवारासोबतच राहत होत्या आणि त्यांचे म्हणजे मीराबाईंचे बाबासाहेबांच्यावर खास लक्ष होते. मीराबाई आई नसलेल्या भिवाचे लाड करत. घरी नाथपंथी वातावरण होते. कबीर आणि नामदेव-तुकाराम यांच्यावर रामजींची भक्ती. घरी रोज दोनदा अभंग, स्तोत्रे, दोहे, भजन होत असे. रामायण, महाभारत यांचे वाचन होत असे. बाबासाहेबांची थोरली बहीण पांडवप्रतापवर निरूपण करू शकत होती असे ते सांगतात किचनेर प्रणित सरकारने महारांना सैन्यात घेऊ नये असा निर्णय घेतला तेव्हा आपल्या बंधूवरील अन्याय दूर व्हावा म्हणून रामजींनी न्यायमूर्ती रानडे यांच्या मदतीने निवेदन दिले होते व हा निर्णय रोखला होता. त्या काळात धर्म आणि धार्मिक शिक्षण आवश्यक आहे असे बाबासाहेबांचे मत होते.
अस्पृश्यतेचा भीषण अनुभव
त्यांचे वडील कोरेगावी असताना त्यांना भेटायला गेलेल्या बाबासाहेबांना अस्पृश्यतेचा पहिला अनुभव आला. मसूर पर्यंत रेल्वेने गेल्यावर ते स्टेशनवर थांबून होते. स्टेशन चालकाने गाडी मिळवून दिली. मुलं महार आहेत हे समजताच गाडीवानाने सर्वांना खाली उतरवले. मग दुप्पट भाडे देण्याचे ठरल्यावर तो मुलांनी गाडी हाकरावी व स्वतः तो मागे चालेल या गोष्टीला तयार झाला. वाटेत त्यांना कोणीही पाणी दिले नाही. काहींनी घाणेरड्या पाण्याकडे बोट दाखवले. दुसऱ्या दिवशी अर्धमेले होऊन आम्ही पोहोचलो असे बाबासाहेब सांगतात. शाळेतही त्यांना बसायला घरून गोणपाट घेऊन जावे लागत असे. त्यांच्या वह्यांना अनेक शिक्षक स्पर्श करत नसत. एकदा स्पृश्य हिंदू लोकांच्या पाणवठ्यावर पाणी प्यायल्याने त्यांना काळे-निळे होईपर्यंत मारण्यात आले. न्हावीही विटाळ होईल म्हणून त्यांना स्पर्श करीत नसे, त्यांची बहीण हे काम करत असे.
शाळेत असताना मी खूप जिद्दी आणि हट्टी होतो असे बाबासाहेब सांगतात. एकदा भावाने सांगूनही ते भर पावसात भिजत शाळेत गेले. पेंडसे गुरुजींचा तास सुरु होता. भिजलेल्या भिवाला गुरुजींनी आपल्या मुलाबरोबर त्यांच्या घरी पाठवले व अंघोळ करून नवी कोरडी लंगोटी घालायला सांगितलं. शीळ घालत बाहेर बसलेल्या भिवाला पेंडसे गुरुजी आत मुलेच आहेत, लाजतोस कसला म्हणून आत बसवले. तेव्हापासून बाबासाहेबांनी हट्टीपणा कमी करायचे ठरवले. पुढे त्यांना आंबेडकर नावाचे ब्राम्हण शिक्षक शिकवायला आले. त्यांनी बाबासाहेबांना प्रेम दिले. त्यांचे आडनाव आंबडवेकर असे विचित्र असल्याने ते बदलून आपले आंबेडकर हे नाव त्यांना दिले. हे गुरुजी भिवाच्या ओंजळीत मोठ्या प्रेमाने भाजी भाकरी घालत असत. हे प्रेम बाबासाहेबांच्या लक्षात राहिले व पुढे गोलमेज परिषदेला जाताना त्यांनी आपल्या गुरूला पत्रही पाठवले.
पुढे रामजींनी लग्न केले जिजाबाई नामक विधवा स्त्रीशी. ती भीमाबाईंचे कपडे दागिने वापरत असे हे बाबासाहेबांना आवडत नसे. एकदा त्यांनी दागिने घातले असताना मीराबाई आणि मुलांना भीमाबाईंची आठवण आली आणि सर्व रडू लागते. त्यामुळे क्रोधीत झालेल्या रामजींनी सर्वांना सुनावले. तेव्हा बाबासाहेबांनी स्वतःच्या पैशावर जगण्याचा निश्चय केला. काही काळ हमाली सुद्धा केली. त्यांनी मुंबईत मजूरी करायला पळून जायचे ठरवले आणि गाडीभाड्यासाठी आत्या मीराबाईचा बटवा पळवला … त्यात फक्त अर्धा आणाच होता. हे पाहून बाबासाहेबांना त्यांची चूक समजली आणि त्यांच्यात आमूलाग्र बदल घडू लागला. ते मोठ्या गांभीर्याने आणि मेहनतीने अभ्यास करू लागले.
आनंदरावांना संस्कृत शिकण्याची फार इच्छा होती पण संस्कृत शिक्षकाने महाराला संस्कृत शिकवणार नाही असे सांगितलं आणि त्यांना पर्शियन शिकावी लागली. पुढे बाबासाहेबांच्या बाबतीतही हेच घडले. भीमरावांप्रमाणेच मुकुंद जयकरांनाही असेच संस्कृत पासून तोडले गेले. वास्तविक पाहता बाबासाहेबांचे संस्कृत वर प्रचंड प्रेम होते. पर्शियनमध्ये त्यांचे मन रमेना. संस्कृतमधील काव्यमीमांसा, अलंकारशास्त्र यांचे बाबासाहेबांना खूप आकर्षण. त्यांनी स्वप्रयत्नाने संस्कृत शिकले. इंग्लिशचे शिक्षण मात्र रामजींनी बाबासाहेबांना उत्तम प्रकारे दिले. सरकारी शाळेत तरी चांगली वागणूक मिळेल ही अपेक्षा व्यर्थ ठरली. तू महार … काय करणार आहेस संस्कृत शिकून असे सांगून एका शिक्षकाने भिवाची हेटाळणी केली पण ते नाउमेद झाले नाहीत. एकदा फळ्यावरील प्रश्न सोडवण्यासाठी बाबासाहेब उठले आणि वाटेत डबे असल्याने मुलांनी इतका गलका केला आणि कोलाहल केला की त्यांना खूप अपमानास्पद वाटले.
बाबासाहेबांना वाचनाची प्रचंड आवड होती. रामजींना मुलांनी अवांतर वाचणे अजिबात आवडत नसे पण ते भीमाची इच्छा पूर्ण करत असत. जर जवळ पैसे नसतील तर आपल्या थोरल्या मुलीकडून दागिना उसना घेत, तो मारवाड्याकडे गहाण टाकून पैसे घेत व पुस्तक घरी येत असे. नंतर पेन्शन मिळाली की रामजी दागिना सोडवून परत देत. बाबासाहेबांना अभ्यास करायला जागा मिळत नव्हती. त्यामुळे रात्री अभ्यास करायचा बेत सुरु झाला. बाबासाहेब पहाटे २-५ अभ्यास करत. मॅट्रिक पास झालेल्या बाबासाहेबांना पाहून रामजींना खूप संतोष झाला. १७ व्या वर्षी त्यांचा रमाबाईंशी विवाह झाला. रावबहादूर एस के बोले आणि आचार्य केळुस्कर अशा मोठ्या लोकांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. केळुस्करांनी बाबासाहेबांना बुद्ध चरित्र भेट दिले. शिवराम कांबळे, कर्मवीर विठ्ठल राम अशा नेमस्त पण आद्य दलित चळवळ कार्यकर्त्यांशी बाबासाहेबांचा संपर्क आला. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकत असताना कोव्हर्टन, मुलर अशा प्राध्यापकांनी त्यांना शिकवले. मुलर तर त्यांच्यावर इतके प्रेम करत की त्यांना आपला सदराही त्यांनी दिला होता. शिक्षण पूर्ण करण्यासाठी २५ रुपयांची शिष्यवृत्ती बडोदा नरेश सयाजीरावांनी बाबासाहेबांना दिली आणि १९१२ मध्ये बाबासाहेब बीए आर्टस् उत्तीर्ण झाले.
संदर्भ – डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रंथ – लेखक धनंजय कीर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत