महार जातीचा परिचय थोडक्यात......

                              महाराष्ट्रात ज्या जाती अस्पृश्य समजल्या जातात त्यामध्ये महार जात ही प्रमुख आहे . या जातीचा जुना इतिहास काळाच्या ओघात गडप झालेला आहे . या इतिहासाची जी बारीकसारीक माहिती प्रकाशात आलेली आहे त्यावरून असे दिसून येते की , महार लोक हे महाराष्ट्राचे मूळ रहिवासी होते . एवढेच नव्हे तर , तेअत्यंत बुद्धिमान , सुसंस्कृत आणि पट्टीचे लढवय्ये होते आणि एके काळी महाराष्ट्राचे राज्यकर्ते होते .

                    ' महारांचे राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र ' असे विधान करणारे पहिले विद्वान ब्राह्मण गृहस्थ राजारामशास्त्री भागवत होत . नाग लोक म्हणजेच महार लोक होत असेही त्यांचे मत होते . भागवतांच्या या मतांना उचलून धरणारे दोन पंडित ब्राह्मण गृहस्थ पुढे निघाले . ते म्हणजे इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे आणि ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर हे होत . त्यांच्या पुढील काळातही या मतांचा अनुवाद करणारे काही विद्वान गृहस्थ निघाले , आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समाजशास्त्रविशारद व हिंदुस्थानातील एक अव्वल दर्जाचे संशोधक - लेखक प . वा . डॉ . श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी आपल्या ' प्राचीन महाराष्ट्र या ग्रंथात हेच मत स्पष्ट स्पष्टीकरणे देऊन प्रदर्शित केलेले आहे .  त्यांचे असे मत आहे की , भारतीय युद्धाच्या अगोदर महाराष्ट्रातच भोज ( भोई ) , कोळी , महार , रठ्ठ , मान्य , इत्यादी ज्या अनेक टोळ्यांचे लोक राहत असत , त्यांत महार आणि रठ्ठ टोळ्यांतील लोक प्रमुख होते . ते संख्येने इतरांपेक्षा प्रबल व राज्यकर्ते होते . महार ही टोळी मूळ रहिवासी . रठ्ठ ही महाराष्ट्रात नंतर येऊन राहिलेली टोळी होय . महाराष्ट्र हा शब्द व मराठी भाषा या दोन्ही गोष्टी महार व रठ्ठ वंशांच्या मिलाफाने झालेल्या आहेत . या दोन्ही टोळ्या परस्परांत लढल्या व त्यांच्यात पुढे समझोता झाला . त्यांच्या एकीकरणामुळे  महाराष्ट्र हे  नाव  पडले असावे.

                     सर्व अस्पृश्यांत हिंदुसमाजाकडून जास्तीत जास्त हाल व अपमान झाले असतील तर ते महारांचे , पेशवाईच्या वेळेस यांच्यावर गळ्यात मडके बांधून फिरण्याची सक्ती होती . व गावात जर ब्राह्मण समोर दिसला तर तो यांच्या छायेने अपवित्र होऊ नये म्हणून यांना जमिनीवर पालथे पडण्याचा हुकूम होता . इतकेच नव्हे तर , जमिनीवर पडलेल्या यांच्या पावलांच्या खुणांनी ब्राह्मण अपवित्र होऊ नये म्हणून यांना काटेरी झुडूप किंवा झाडू  स्वतःच्या मागे घेऊन हिंडावे लागे व त्या झुडुपाने अथवा झाडूने आपल्या पावलांचा माग पुसून टाकावा लागे ..

                           महारांची दुसरी नावे अतिशूद्र व भूमिपुत्र . ( भूइया हे ओरिसामधील नाव आहे . त्याचा अर्थ पण भूमीचा मुलगा असाच होतो . हे साधर्म्य लक्षात घेण्याजोगे आहे . ) या दोन्ही नावांवरून ते आदिवासी असावेत व आर्यांनी त्यांना आपणात मिसळल्यानंतर कायमचेच अस्पृश्य बनवले असावे . एन्थोबनच्या मताप्रमाणे यांच्यात जे निरनिराळे पन्नास विभाग आहेत ते सर्व आदिवासी जमातीचे भाग असावेत व ते भाग आर्याच्या आक्रमणानंतर एकत्र होऊन आपणास महार या नावाने ओळखू लागले असावेत . कदाचित महाराष्ट्र हे नावही महारांवरून पडले असण्याचा संभव आहे . आजही हे आदिवासी जमातींच्या पुढाऱ्यांप्रमाणे आपणास नाक म्हणजे नाईक म्हणवतात . काहींच्या मते नाक हा नाग या शब्दाचा अपभ्रंश असून , वेदपुराणात नाग नावाचे जे लोक वर्णन केले आहेत ते हेच असावेत .

        पददलित  दशेत दिवस काढणाऱ्या आजच्या  महारांचे पूर्वज एकेकाळी राज्यकर्ते होते. 

                        ज्या महाराष्ट्र देशाला महारांनी जन्म दिला व परमवैभवाला चढविले त्याच  महाराष्ट्रात महारांना कालांतराने राजकीय , धार्मिक , सामाजिक व आर्थिक गुलामगिरी पत्करून लाचारीचे जिणे कंठावे लागले . या गुलामगिरीच्या नरकयातना महाराष्ट्रातील जर कोणत्या भागात अत्यंत तीव्रतेने महारांना भोगाव्या लागत असतील तर त्या कोकणात . असे असूनही कोकणचे महार वेळ येईल तेव्हा हातात नांगर धरून व वेसकराची काठी घेऊन आपले आयुष्य सेवाचाकरीत घालवीत , आणि तशीच वेळ आली तर हातात नंगी समशेर घेऊन आपल्या महार रक्ताचे दिव्य तेज रणांगणात प्रगट करीत . अशा तऱ्हेने जीवन व्यतीत करणाऱ्या एका महार कुटुंबात डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच डॉ . भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.