बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे .....भाग २

                   बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे 


              आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मी मिळवीन याची मला खात्री आहे.  ( डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष व प्रचंड टाळ्या ) मी मेल्यावर काय होईल ? हे सांगता येणार नाही. या चळवळीसाठी आपणास फार मोठे काम करावे लागेल, आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल?अडचणी आल्याच तर त्या कशा टाळता येतील?त्यासाठी काय युक्तिवाद व खटाटोप करावा लागेल? याचा मी पूर्ण विचार केला आहे. माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे. ते काय प्रकाराने भरले आहे ते मला पूर्ण माहीत आहे . हे जे हक्क मिळविले ते मीच माझ्या लोकांच्यासाठी मिळविले आहेत. हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईन अशी मला खात्री आहे. म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊन चालले पाहिजे.

             मला एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटते.एवढा वादविवाद सर्वत्र होतो आहे,पण एकाही माणसाने मी बौद्ध धर्मच का स्वीकारला? हा प्रश्न मला विचारला नाही. कोणताही दुसरा धर्म न स्वीकारता हाच धर्म का स्वीकारला, हा कोणत्याही धर्मातराच्या चळवळीतील मुख्य आणि महत्त्वाचा प्रश्न असतो. धर्मांतर करताना धर्म कोणता व का स्वीकारायचा हे तावून सुलाखून पाहिले पाहिजे. आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ १९३५ पासून येवले येथे एक ठराव करून हाती घेतली. मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल ती खरी करून दाखविली. मला इतका आनंद झाला आहे कि, हर्षवायुच झाला आहे .नरकातून सुटलो असे मला वाटत आहे. मला धर्मामध्ये कोणी अंधभक्त नको आहेत त्यांना तो धर्म पटला पाहिजे.ज्यांना बौद्ध धर्मात यावयाचे आहे त्यांनी जाणिवेने आले पाहिजे. मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला धर्म अत्यंत आवश्यक आहे.

                            मला माहीत आहे की कार्ल मार्क्सच्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्त्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट  ( न्याहारी ) मिळाली, त्यात पाव, मलई, लोणी,कोंबडीची टांग वगैरे असले पोटभर जेवण मिळाले,निवांत झोप मिळाली व सिनेमा पाहावयास मिळाला की सगळं संपल. हे त्यांचं तत्त्वज्ञान! मी त्या मताचा नाही. माझे वडील गरीब होते,म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळालेले नाही.माझ्याइतके कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही. म्हणून माणसाचे जीवन सुखसमाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते याची मला जाणीव आहे. आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो. त्या चळवळीविरूद्ध मी नाही. माणसाची आर्थिक उन्नती व्हावयास पाहिजेच पण मी याबाबत एक महत्त्वाचा फरक करतो. रेडा,बैल आणि  माणूस यामध्ये फरक आहे . रेडा व बैल यांना रोज वैरण लागते. माणसासही अन्न लागते. मात्र दोहोत फरक हा आहे की रेडा व बैल यांना मन नाही, मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे .म्हणून दोन्हीचाही विचार करावयास हवा.मनाचा विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे. ते सुसंस्कृत बनविले पाहिजे. ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही असे म्हणतात त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्याचे मला काहीच प्रयोजन नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहिजे त्याशिवाय  मानव जातीचा उत्कर्ष झाला असे म्हणता येणार नाही.

                     मनुष्याचे शरीर अथवा मन हे रोगी का असते ? त्याची कारणे ही की त्यास एकतर शारीरिक पीडा असते किंवा मनाट उत्साह नसतो. मनात उत्साह का राहात नाही ? त्याचे पहिले कारण हे आहे की, मनुष्यास अशा रीतीने ठेवण्यात आले आहे की त्याला वर येण्याची संधी मिळत नाही,त्यावेळी त्यास उत्साह कोठून असणार? तो रोगीच असतो. ज्या माणसाला आपल्या कृतीचे फळ मिळू शकते असे वाटते त्यास उत्साह प्राप्त होतो. नाही तर शाळेत शिक्षक असे म्हणू लागले की, कोण रे हा ? हा तर महार! आणि हा महारडा पहिल्या वर्गात पास होणार? याला प्रथम श्रेणी कशाला पाहिजे ? तू आपला तृतीय श्रेणीतच राहा. पहिल्या वर्गात येणे हे ब्राह्मणाचे काम ! अशा व्यवस्थेत त्या मुलाला काय उत्साह मिळणार? त्याची उन्नती ती काय होणार? उत्साह निर्माण करण्याचे मूळ मनात आहे.ज्याचं शरीर व मनही धडधाकट असेल,जो हिम्मतबाज असेल,मी कोणत्याही परिस्थितीतून झगडून बाहेर पडेल असा ज्यास विश्वास वाटतो त्यांच्यामध्येच उत्साह निर्माण होतो व त्याचाच उत्कर्ष होतो. हिंदू धर्मात अशी काही विलक्षण तत्त्वप्रणाली ग्रंथित केलेली आहे की त्यापासून उत्साहच वाटत नाही.माणसाला निरूत्साही करून टाकणारी परिस्थिती हजारो वर्षे टिकली तर जास्तीत जास्त कारकुनी करून पोटे भरणारे लोक तयार होतील. या पलिकडे दुसरे काय होणार? मनुष्याच्या उत्साहाला काही कारण असेल तर मन ! तुम्हाला मिलचे मालक माहीत आहेत का? ते गिरण्यावर मॅनेजर  नेमतात व त्यांच्याकरवी मिलमधील कामे करून घेतात. हे मिलचे मालक कसल्या ना कसल्या व्यसनात असतात. त्यांच्या मनाचा सुसंस्कृत असा विकास झालेला नसतो. आपल्या सर्वांच्या मनाला उत्साह वाटेल  म्हणून आपण चळवळ सुरु  केली तेव्हा कोठे शिक्षण सुरू झाले.मी लंगोटी घालून शिक्षणाला सुरूवात केली. शाळेमध्ये मला पिण्यास  पाणी सुद्धा मिळाले नाही. पाण्याशिवाय शाळेत मी किती तरी दिवस काढले. मुंबईसारख्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये देखील अशीच परिस्थिती होती. अशी परिस्थिती असेल तर दुसरी काय अवस्था निर्माण होणार ? कारकुनीच निर्माण होईल.

                   मी दिल्लीच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये असताना लॉर्ड लिनलिथगो व्हाईसरॉय होते. मी त्यांना म्हणालो, “तुम्ही सर्वसामान्यासाठी खर्च तर करताच,पण मुसलमानांकरता अलिगड युनिव्हर्सिटीस तीन लाख रुपये, त्याचप्रमाणे बनारसच्या हिंदू विद्यापीठासही तुम्ही तीन लाख रुपये शिक्षणाकरता खर्च करता. मात्र आम्ही हिंदू नाही मुसलमान नाही,आमच्यासाठी काही करावयाचे म्हटले तर त्यांच्या हजारो पटीने जास्त करावयास हवे”. तेव्हा लिन्लिथगोने सांगितले,"तुम्हाला याबाबत काय लिहून आणावयाचे ते आणा”. त्याप्रमाणे मी एक मेमोरेंडम लिहिले,ते चोपडे अजून मजजवळ आहे . युरोपियन लोक मोठे सहानुभूतीचे होते. त्यांनी माझे म्हणणे मान्य केले,पण घोडे जे पेंड खाऊ लागले ते हे पैसे कोणत्या गोष्टीवर खर्च करावयाचे त्यावर. त्यांना वाटत होते कि,आमच्यातील मुली शिकलेल्या नाहीत. त्यांना शिक्षण द्यावे. त्यांच्यासाठी  बोर्डिंग  काढावी व त्यावर ते पैसे खर्च करावेत. आमच्यातील मुलींना शिकविले व सुशिक्षित केले  तरी त्यांना वेगवेगळ्या पक्वान्नांचे पदार्थ करावयास घरी सामान कोठे आहे ? त्यांच्या शिक्षणाचा शेवटी परिणाम काय ? इतर गोष्टीवरील रक्कम सरकारने खर्च केली पण  शिक्षणावरील अडवून ठेवली.

                            एके दिवशी मी लिन्लिथगोकडे गेलो आणि या शिक्षणावरील खर्चाबाबत म्हणालो,”तुम्हाला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारतो”. मी एकटा ५० ग्रॅज्युएटच्या समान आहे की नाही ? ते त्यांना मान्य करावे लागले. नंतर मी पुन्हा विचारले,याचे कारण काय ? ते म्हणाले, ते कारण आम्हास माहीत नाही” . मी म्हणालो की, “माझी विद्वत्ता एवढी मोठी आहे की मी राजवाड्याच्या टोकावर जाऊन बसू शकतो . मला अशी माणसे हवी आहेत . कारण तेथून सर्वत्र टेहळणी करता येते”. आमच्या लोकांचे संरक्षण करावयाचे असेल तर अशी पारध करणारी माणसे निर्माण झाली पाहिजेत. कारकून काय करणार? त्यासरशी लिन्लिधगोस माझे म्हणणे पटले व त्या वर्षी १६ विद्यार्थ्यांना विलायतेत उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले.

                        या देशात आम्हाला हजारो वर्षे निरुत्साही करून ठेवील अशी परिस्थिती आहे . ही परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या उन्नतीबद्दल उत्साह उत्पन्न होणे शक्य नाही. या बाबतीत या धर्मात राहून आम्ही काहीच करू शकत नाही. मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्ण्य सांगितले आहे ते अत्यंत घातक आहे . चातुर्वर्ण्य व्यवस्था ही मनुष्यमात्राच्या उत्कर्षालाअडसर आहे  मनुस्मृतीत लिहिले आहे की, शूद्रांनी फक्त सेवा चाकरी करावी. त्यांना शिक्षण कशाला? ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे,क्षत्रियाने शस्त्रे धारण करावीत, वैश्याने व्यापार उदीम करावा व शूदाने चाकरी करावी. ही घडी कोण उलगडू शकेल ? ब्राह्मण,क्षत्रिय व वैश्य वर्णाच्या लोकांना काही ना काही फायदा आहे. शूद्रांचे काय ? तीन वर्ण सोडले तर इतर जातीत काही उत्साह उत्पन्न होईल काय?

                               हिंदू धर्मामध्ये समता नाही. गांधींना एकदा मी भेटावयास गेलो असता ते म्हणाले,”मी चातुर्वर्ण्य मानतो”. मी म्हणालो,”तुमच्यासारखे महात्मे चातुर्वर्ण्य मानतात ! पण हे चातुर्वर्ण्य कोणते व कसे? ( हाताच्या पंजाची बोटे एकावर एक येतील असा हात करून ) हे चातुर्वर्ण्य उलट की सुलट ?चातुर्वर्ण्याची सुरूवात कोणीकडून व शेवट कोठे"? गांधींनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि देणार तरी काय ? आमचा ज्या लोकांनी नाश केला त्यांचा देखील या धर्माने नाश होईल ! हा मी हिंदू धर्मावर उगीच आरोप करीत नाही. हिंदू धर्मामुळे कोणाचाही उद्धार होऊ शकणार नाही. तो धर्मच नष्टधर्म आहे .      

                       आपला देश परकीयांच्या ताब्यात का गेला ? युरोपमध्ये १९४५ पर्यंत लढाया चालू होत्या. जेवढे सैन्य मरत असे तेवढे सैन्य  भरतीमुळे पुढे येत असे. त्यावेळी कोणीही आम्ही लढाई जिंकली असे म्हणू शकले नाही. आमच्या देशाचे सगळे काही निराळे ! क्षत्रिय मेले की आम्ही खलास! आम्हाला जर शस्त्रे धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश पारतंत्र्यात गेला नसता. मग कोणीही हा देश जिंकू शकले नसते.

 

 

क्रमश: भाग २................

      

         शब्दांकन

आयु.भास्कर गायकवाड

   ९८५०२४७६२१

         आभार

आयु.  डॉ.सुरेश कोरे साहेब

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.