मी हिंदू का ? हे कसे समजावे ?

मी हिंदू का ? हे कसे समजावे ? 

  ( आपण ' हिंदू ' का आहोत हे समजण्यातील अडचणी ) 

         


                      हिंदुस्थान हा अनेक जातीजमातींचा , संमिश्र समाजाचा देश आहे . त्यात पारशी आहेत , ख्रिस्ती आहेत , मुसलमान आहेत , हिंदू आहेत . या जातिव्यवस्थेचा पाया ' वंश ' हा नसून ' धर्म ' आहे . पण हा वरवरचा उथळ विचार आहे . पारशी हा पारशी का ,  ख्रिस्ती हा ख्रिस्ती  का , मुसलमान हा मुसलमान कसा , आणि हिंदू हा हिंदू कसा हे जाणून घेणे मनोरंजक ठरेल . 

                       पारशी , मुसलमान , ख्रिश्चन यांबाबत हे सांगणं सोपे आहे . एखाद्या पारशाला विचारा , “ तू स्वतःला पारशी का म्हणवतोस ? ” या प्रश्नाचे उत्तर देणं पारशी माणसाला अवघड वाटत नाही . तो सांगेल “ मी पारशी आहे कारण मी झोरास्टरचा उपासक आहे . ' आता हाच प्रश्न मुसलमानाला विचारा . त्यालाही उत्तराला विलंब होणार नाही . तो लगेच सांगेल “ मी इस्लामचा उपासक आहे म्हणून मी मुसलमान आहे . ” 

                    आता हाच प्रश्न हिंदूला विचारा . तो गोंधळून जाईल . काय उत्तर द्यावं ते त्याला समजणार नाही . 

                  “ हिंदू जमात ज्या देवांची उपासना करते त्या देवांची उपासना मी करतो म्हणून मी हिंदू आहे ” असे उत्तर त्यानं दिलं तर ते तितकंसं खरं नाही . सर्व हिंदू एकाच देवाची उपासना करीत नाहीत . काही लोक एकच देव मानणारे , काही लोक अनेक देवांची उपासना करणारे तर काही लोक ईश्वर आणि सृष्टी एकच आहे असे मानणारे आहेत . जे एकेश्वरवादी आहेत ते सर्व हिंदू एकाच देवाची उपासना करतात असेही नाही . कुणी विष्णू , कुणी राम , कुणी शिव , कुणी कृष्ण यांची उपासना करतात . काही हिंदू पुरूष देवतांना न मानणारे आहेत . ते स्त्रीदेवतांचे उपासक , देवीउपासक असतात आणि असे असूनही ते एकाच देवीचे उपासक असतात असे नाही . कुणी कालीचे उपासक , कुणी पार्वतीचे पूजक , तर कुणी लक्ष्मीचे भक्त . 

                    काही लोक अनेक देवांची उपासना करतात . विष्णु आणि शिव , राम आणि कृष्ण यांची एकाच वेळी उपासना करणारे लोक आहेत . तेच लोक काली , पार्वती , लक्ष्मी यांचीही पूजा करतात . शिवरात्रीच्या दिवशी शिवोपासना म्हणून उपवास करणारा हिंदू .. एकादशीच्या दिवशी विष्णुची उपासना म्हणूनही उपवास करील . शंकरासाठी तो बेलाचं झाड लावील तर विष्णूसाठी तुळशीला पाणी घालेल . काही हिंदूंची उपासना हिंदू देवतांपूरतीच मर्यादित नसते . ते मुसलमानी पीर किंवा ख्रिश्चन देवता यांचीही पूजा करतात . अनेक हिंदू पीराची पूजा करतात , उरुस असेल तिथं जातात . काही ठिकाणी पीरांचे पूजक वंशपरंपरेने ब्राह्मणच आहेत . ते मुसलमानी वेष परिधान करतात . मुंबईजवळील मत माउली या ख्रिश्चन देवीचे उपासक कितीतरी हिंदू आहेत . 

                    ख्रिस्चन आणि मुस्लिम देवतांची पूजा ही प्रासंगिक असते . पण कधीकाळी साऱ्या धर्मनिष्ठाच हिंदूंनी कायम स्वरूपात बदललेल्या आहेत असे दिसून येते . असे अनेक तथाकथित हिंदू आहेत की , ज्यांच्या धर्मात अनेक मुसलमानी तत्त्वांचा समावेश झाला आहे . पंचपीरीय प्रणाली हा एक हिंदू धर्मपंथ आहे . तो मानणारे हिंदू पाच मुसलमानी फकीरांची पूजा करतात . दफाली फकीर हा केवळ याच कामासाठी असतो . या पंथाचे हिंदू लोक या पंचपीरांना कोंबडं देतात . हिंदुस्थानभरचे अनेक हिंदू मुसलमानी धर्माच्या पवित्र स्थानांच्या तीर्थयात्रा करतात . पंजाबात सखी सरवार या नावाचं एक असं ठिकाण आहे . 

                      “ मी हिंदू आहे करण मी हिंदू धर्मशास्त्राचे पालन करतो ” असे तो म्हणत असल तरी ती वस्तुस्थिती नाही . कारण हिंदुत्त्वाचा कुठलाच एक संप्रदाय नाही . ख्रिश्चन धर्मश्रद्धांमध्ये खूपच फरक आढळतो . मुख्य आणि महत्त्वाच्या धर्मश्रद्धांबाबत हिंदूमध्ये आणि मुसलमान यांच्या धर्मश्रद्धांशी तुलना करता हिंदू लोकांच्या एकमेकांच्या एकवाक्यता आढळत नाही . काही हिंदू म्हणतात की हिंदूचे सर्व पवित्र ग्रंथ स्वीकार्य आहेत ; काही लोक तंत्र मानीत नाहीत . काही लोक वेदांचेच महत्त्व मानतात . काहीजण कर्मसिद्धांतावरच विश्वास ठेवणारे आहेत .

                     अनेक संप्रदायांची आणि तत्त्वांची संमिश्र असलेली सरमिसळ म्हणजे हिंदुत्त्व होय . या हिंदुत्त्वाच्या प्रवेशद्वारात एकेश्वरवादी , अनेकेश्वरवादी सर्वांना प्रवेश आहे ; शिव आणि विष्णू यांचे पूजक ; पार्वती आणि लक्ष्मी यांचे उपासक ; आदिमाता किंवा ग्रामदेवता यांचे उपासक ; रक्तविधीने आपल्या देवतेची कृपा संपादन करून घेणारे लोक ; पूर्ण अहिंसावादी , साध्या जीवजंतूंना मारणे तर राहोच पण हिंसेचे शब्दसुद्धा ज्यांना व्यर्थ आहेत असे लोक ; ज्यांच्या धर्मविधीत केवळ प्रार्थना आणि स्तोत्रे आहेत असे लोक ; धर्माच्या नावाखाली मद्यसेवनाचे उपचार अवलंबिणारे लोक ; आणि अशा प्रचलित मतांविरूद्ध असलेला पण संख्येने खूप मोठा असलेला समाज , ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व न मानणारा समाज , ज्यांचे धार्मिक नेते अब्राह्मण आहेत असा समाज हे हिंदू समाजाचे चित्र आहे .

                        " मी हिंदू आहे कारण इतर अनेक हिंदू जे रितीरिवाज पाळतात तेच मी पाळतो ” असे एखादा हिंदू म्हणेल तर ते खरे नाही . कारण सर्व हिंदू सारे रितीरिवाज सर्वत्र पाळतात असे नाही ..

                         उत्तरेत निकटच्या नातेवाईकांत विवाह होत नाहीत ; पण दक्षिणेत चुलत - मामे भाऊ - बहिण यांची लग्ने होतात . याहूनही अधिक निकटच्या नात्यातील लग्नांना मान्यता मिळते . नियम म्हणून स्त्रीची शुद्धता , पावित्र्य यांना खूप महत्त्व दिले जाते . पण अनेकवेळा ही शुद्धता विवाहापूर्वीच नष्ट केली जाते आणि अनेक मुलींना ' भाविणी ' करण्यात समाज धन्य मानतो . या देशाच्या काही भागात स्त्रियांना मुक्तपणे वावरण्याची मुभा आहे तर काही भागात त्यांना बंदी आहे . काही ठिकाणी स्त्रिया स्कर्ट वापरतात तर काही ठिकाणी पुरूषांप्रमाणेही वेष परिधान करतात . 

                               आता आणखी एक मुद्दा . एखादा हिंदू म्हणू लागला की मी हिंदू आहे कारण मी जातिव्यवस्था मानतो ...... तर हेही खरे नाही . एक खरे की कोणत्याही हिंदू माणसाला आपल्या शेजाऱ्याचे रितिरिवाज कोणते याच्याशी कर्तव्य नाही . पण आपण त्याच्याबरोबर बसून खावे का नाही , त्याच्या हातून पाणी प्यावे की नाही याचा तो अवश्य विचार करेल . याचाच अर्थ असा की , जातिव्यवस्था हे हिंदुत्त्वाचे आवश्यक अंग आहे . आणि अर्थातच जो माणूस कोणत्याही मान्य हिंदू जातीचा नाही तो हिंदू नसतो . हे खरे असले तरी हिंदुत्त्वाबाबत जातिव्यवस्था पाळणे एवढेच पुरेसे नसते . मुसलमान व ख्रिश्चन या धर्मात रोटी - व्यवहारात नसली तरी बेटीव्यवहारात जात पाहिली जातेच . पण एवढ्याने त्यांना हिंदू म्हणता येणार नाही . आवश्यकता दोन गोष्टींची असते . हिंदू हा हिंदूच असला पाहिजे आणि तो जातिव्यवस्था मानत असला पाहिजे . यातूनच पूर्वीचा प्रश्न उपस्थित होतो .. हिंदू कोणाला म्हणावे ? 

                           प्रत्येक हिंदू माणसाला आपण हिंदू का आहोत ? याचे  उत्तर देता यायला पाहिजे ,ते परशाला देता येते,ते मुसलमानाला देता येते ,ते ख्रिच्छनाला देता येते,पण.....हिंदू माणसाला देता येत नाही.

यामागची कारणे कोणती ?हा धार्मिक गोंधळ नेमका काय आहे याची जाणीवपूर्वक उत्तरे शोधण्याची वेळ आता आली आहे.

संदर्भ -  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  लिखित

  RIDDLES IN HINDUISM  ( हिंदुत्वातील कुट प्रश्न )

      अनुवाद - लेखक डॉक्टर न. म. जोशी

भास्कर गायकवाड 

९८५०२४७६२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.