ज्या लोकामध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य

  

  ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य

 नवयुग : आंबेडकर विशेषांकासाठी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी दिलेला संदेश

                    


 
माझ्या पंचावन्नाव्या वाढदिवशी तुम्ही खास अंक काढीत आहात . त्यासाठी तुम्हांला संदेश पाहिजे आहे . आपल्या या हिंदुस्थानामध्ये राजकीय पुढाऱ्याला अवतारी पुरुषाप्रमाणे मान दिला जातो ही दुर्दैवाची गोष्ट आहे . हिंदुस्थानाबाहेर केवळ महापुरुषांच्याच जयंत्या साजऱ्या केल्या जातात . पण हिंदुस्थानांत अवतारी पुरुष आणि राजकीय पुरुष या दोघांचेही जन्मदिवस पाळले जातात . असे असावें ही दुःखाची गोष्ट आहे

                    व्यक्तिशः माझा वाढदिवस साजरा व्हावा हे मला मुळींच आवडत नाही . मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे . मला विभूतिपूजा कशी आवडेल ? विभूतिपूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे . पुढारी लायक असेल तर त्याबद्दल कौतुक , प्रेम , आदर ह्या भावना बाळगायला हरकत नाही . तथापि तेवढ्यानेच त्या पुढाऱ्यांचे आणि त्यांच्या अनुयायांचे समाधान व्हावयास हवे . पण पुढाऱ्यांची देवाप्रमाणे पूजा करणें ही गोष्ट मला बिलकूल मान्य नाही , त्यामुळे त्या पुढाऱ्याबरोबर त्याच्या भक्तांचाही अधःपात होतो . पण हे ह्या ठिकाणी सांगून काय फायदा ? राजकीय पुढाऱ्याला अवतारी पुरुषांच्या आसनावर एकदा चढवून अनुयायांना संदेश हा दिलाच पाहिजे ! बसविले म्हणजे त्याला तें आपले सोंग उत्तम तऱ्हेने पार पाडलेच पाहिजे आणि आपल्या अस्पृश्यांना मी काय संदेश देऊ बरे ? संदेश देण्याऐवजी मी त्यांना ग्रीक पुराणांतील एक गोष्ट सांगतो . डिमेटर ह्या ग्रीक देवतेवर होमरने लिहीलेल्या स्तोत्रांत ही गोष्ट आलेली आहे . " ही डिमेटर देवी आपल्या मुलीच्या शोधार्थ हिंडत केलीओसच्या राज्यांत आली . तिनें दाईचा वेष घेतला होता . म्हणून तिला कोणी ओळखले नाही . राणी मेहोनैराने आपले डिमोफून ' नांवाचे तान्हे मूल सांभाळण्यासाठी तिची नेमणूक केली . रोज रात्री राजवाड्यांतली सर्व मंडळी झोपली म्हणजे दारे बंद करून डिमेटर देवी ह्या मुलाला पाळण्यांतून हळूच बाहेर काढी आणि त्याचे कपडे उतरून ती त्याला जळत्या निखाऱ्यावर ठेवी . ऐकणाराला कदाचित हे क्रूर वाटेल . पण त्या लहान मुलाला ' देव ' करण्याच्या महान तळमळीने आणि प्रेमानें ती हे करीत असे . हळूहळू जळत्यानिखा-याची धग सहन करण्याचे सामर्थ्य त्या मुलामध्ये उत्पन्न झाले . त्याचे बळ वाहू लागले . त्याच्यामध्ये कांही तरी तेजस्वी , दिव्य , अतिमानुष अंश विकसित होऊं लागला . पण एके रात्री त्याची आई एकाएकी खोलीत शिरली आणि आपल्या मुलाचा ' नारायण ' करण्याचा देवतेने चालविलेला तो प्रयोग बघतांच तिने त्या देवतेला ढकलून   दिले . आणि निखान्यावरून एका देवाला मात्र ती मुकली . मूल एकदम उचलले . अर्थात तिचे मूल तिला मिळाले , पण एका अतिमानुष पुत्राला , " ही गोष्ट काय सांगते ? हेंच की , विस्तवातून गेल्यावाचून पौरुष किंवा देवपणा प्राप्त होत नाही ! अनीमधून गेल्यावांचून माणसाची शुद्धी होत नाही . आणि त्याचे बळ वाढत नाही . म्हणून पददलित माणसांना हालअपेष्टांच्या आणि त्यागाच्या अग्रिदिव्यांतून गेल्यावांचून मोठेपणा प्राप्त होणार नाही ! आपला भविष्यकाळ घडविण्यासाठी त्यांना वर्तमानकाळातील सुखांचा आणि गरजांचाही त्याग करावयाला पाहिजे . ' बायबलमध्ये सांगितले आहे की , आयुष्याच्या शर्यतीत भाग घेण्याचे आमंत्रण सर्वांना येते , पण फार मोठे लोक त्यातून उत्तीर्ण होतात , असे कां ? . त्याचे कारण हेच की भविष्याच्या गरजेसाठी वर्तमानातल्या विलासांचा त्याग करायला लागणारे धैर्य किंवा निर्धार पद्दलित माणसाजवळ नसतो . म्हणून आयुष्याच्या शर्यतीमध्ये त्यांना मोठेपणा मिळत नाही . ह्या ग्रीक गोष्टीपेक्षा अधिक महान संदेश कोणता आहे ? माझ्या मते अस्पृश्यांना तर हा सर्वोत्कृष्ट संदेश आहे . त्यांच्या झगड्यांची आणि हालांची मला जाणीव आहे . स्वातंत्र्य मिळविण्यासाठी माझ्याहीपेक्षा त्यांनी छळ सोसला आहे . असे असूनही मी त्यांना हाच संदेश देतो आहे . की , झगडा , आणखी झगडा , त्याग करा , आणखी त्याग करा . त्यागाची आणि हालाची पर्वा न करता एकसारखा झगडा चालू ठेवाल तरच तुम्हाला मुक्ति मिळेल ! ' जागे होऊन प्रतिकार करण्याची अस्पृश्यांची सामुदायिक इच्छाशक्ति वाढली पाहिजे ! आपले कार्य पवित्र आहे यावर त्यांचा दृढ विश्वास पाहिजे . आपले ध्येय हस्तगत करण्याचा त्यांनी संघटितपणे निर्धार केला पाहिजे , अस्पृश्यांचे कार्य इतके महान आहे , आणि त्यांचे ध्येय इतके उदात्त आहे की , त्यांनी एकमुखाने अशी प्रार्थना करावी की : ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे अशी ज्यांना जाणीव आहे ते धन्य होत ! गुलामगिरीवर हल्ला चढविण्यासाठी जे आपले तन , मन , धन आणि तारुण्य कुर्बान करतात ते धन्य होत . आणि अस्पृश्यांना आपली माणुसकी पूर्णपणे मिळेपर्यंत जे बऱ्याची , वाईटाची , सूखाची , दुःखाची , संकटाची , यादळाची , मानाची , अपमानाची पर्वा न करता एकसारखे झगडत राहतील ते धन्य होत !

                                                                           

         संदर्भ - डॉ . बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड -२० पान नं . २६८ ते ३७०



शब्दांकन 

भास्कर गायकवाड

९८५०२४७६२१ 

                                                                                                                    संकलन

डॉक्टर आयु.सुरेश कोरे

२ टिप्पण्या:

Blogger द्वारे प्रायोजित.