वेद अचूक आहेत असा समज का पसरविला ?....

      ब्राह्मणांनी वेदप्रामाण्य उद्घोषित का केले ? 

( वेद अचूक आहेत असा समज का पसरविला ? )

                            


हिंदूंच्या धार्मिक वाङ्मयात वेदांना फार उच्च स्थान आहे असे म्हणणे पूर्णांशाने खरे नाही . त्याचप्रमाणे वेद हे हिंदुधर्माचे पवित्र ग्रंथ आहेत असे म्हणणे हे सुद्धा यथार्थ नाही. . कारण पवित्र ग्रंथांपेक्षा वेद हे असे ग्रंथ आहेत की ज्याच्या प्रामाण्याला वा अधिकाराला कुणी आव्हान देऊ शकणार नाही , त्याबाबत कुणी प्रश्न उपस्थित करणार नाहीत . वेदांबाबत केलेले कोणतेही विधान , अनुमान हे अंतिम असते , तात्पर्षात्मक असते . वेदांचा पुनर्विचार नाही . ब्राह्मणांची वेदांबाबत ही भूमिका आहे आणि ती जवळजवळ सर्व हिंदूंनी स्वीकारली आहे . 

                    वेदप्रामाण्यांची उभारणी कशावर आहे ? वेद हे अपौरुषेय आहेत या मतावर ही उभारणी आहे . वेद हे मानवनिर्मित नाहीत ही त्या पाठीमागे भूमिका आहे . वेद मानवनिर्मित नसल्यामुळे त्यात चुका असणार नाहीत , त्रुटी असणार नाहीत , दोष असणार नाहीत , आणि म्हणून वेद हे प्रमाण मानले पाहिजेत असे ब्राह्मणांचे म्हणणे आहे . 

                      वैदिक ब्राह्मणांनी हा समज कसा पसरविला हे समजून घेणे अवघड आहे . कारण काही ठिकाणी वैदिक ब्राह्मणांनीच वेदप्रामाण्याबाबत वेगळा विचार मांडलेला आढळतो . हे वैदिक ब्राह्मण म्हणजे विविध धर्मसूत्रांचे रचनाकार होते . वेदप्रामाण्याबाबत धर्मसूत्रांनी खालील विचार व्यक्त केलेले आहेत . 

              प्रथम गौतम धर्मसूत्राचा विचार करू या . “ धार्मिक वा पवित्र कायद्याचे ( नीतिनियमांचे ) उगमस्थान म्हणजे वेद ” असे गौतमसूत्रे सांगतात .

              “ धार्मिक नीतिनियमांचे स्पष्टीकरण , विवरण वेदातच आहे , ” असे वसिष्ठ धर्मसूत्रात सांगितले आहे .

 बौद्धायनांची मते खालीलप्रमाणे आहेत . 

 १ ) प्रत्येक वेदात धर्मसूत्रे सांगितली आहेत . 

२ ) आम्ही त्याचे विवरण त्यास अनुसरून करू 

३ ) स्मृतींनी सांगितलेली धर्मसूत्रे त्यानंतर येतात . 

४ ) त्यानंतर शिष्टाचार येतो . आपस्तंभ सूत्रात खालील विचार मांडला आहे .

 ( ५ ) यांत काही चूक आढळली तर १० जणांच्या मंडळाने निर्णय घ्यावा . 

          " दैनंदिन जीवनाचे रीतिरिवाज सांगणारी अशी एक उत्तम कार्यपद्धती ( जी . निर्माणक्षम आहे ) आम्ही आता सांगत आहोत . ' शिष्ट कोण ' याबाबत वशिष्ठ धर्मसूत्रे आणि बौद्धायन धर्मसूत्रे यांनी व्याख्या दिल्या आहेत . 

            " वसिष्ठ धर्मसूत्रात म्हटले आहे " ज्याचे हृदय इच्छामुक्त आहे तो शिष्ट . ” 

            बौद्धायन धर्मसूत्रात ‘ शिष्ट ’ कोण हे अधिक तपशीलवार सांगितले आहे . “ जे खरोखर मत्सर गर्वादिमुक्त आहेत , केवळ दहा दिवसाचा धान्यसाठा केला तरी समाधानी ते शिष्ट आहेत , काम क्रोध, मोह. मद, मत्सर या षड्विकारापासून जे मुक्त आहेत ते शिष्ट होत

             “ घर्मसूत्रांना अनुसरून ज्यांनी वेद आणि वेदांगाचा अभ्यास केला आहे , जे वेदाभ्यासातून पुराव्यासह योग्य अशी अनुमाने काढू शकतात ते शिष्ट होत

    " ज्यांनी याबाबत काही निर्णय घ्यायचे त्यांचे मंडळ कसे असावे या बाबत बौद्धायन सूत्रात खालील विचार मांडले आहेत . 

        “ ज्यांना प्रत्येकी एक तरी वेद पाठ आहे ( अभ्यासला आहे ) असे चारजण ,  यांचे मिळून एक मंडळ असावे .  वेदांगजाणणारा एक मीमांसक , धर्मसूत्रे पाठ करणारा एक पाठक , तीन जातींचे तीन ब्राह्मण घ्यावेत . 

            " पाच , तीन , किंवा एकही विशुद्ध मनुष्य असावा ; त्यानेच धर्मसूत्रांबाबत निर्णय घ्यावा.शतमूर्खाचे ते काम नव्हे .

      “ लाकडाचा हत्ती किंवा कातड्याचा काळवीट असावा तसा अज्ञानी ब्राह्मण असतो .

             धर्मसूत्रांच्या समालोचनावरून असं दिसून येते की एखाद्या प्रश्नाबाबत वाद निर्माण झाला तर त्याच्याबाबत निर्णय करण्यासाठी खालील चार घटकांचा अधिकार होता.

                १ ) वेद 

                २ ) स्मृति 

               ३ ) शिष्टाचार 

               ४ ) अधिकार मंडळाचे मत . 

              वेद हेच एकमेव प्रामाण्य होते , वेदांनाच केवळ असले अधिकार होते असे नाही . एक काळ असाही होता की वेदांव्यतिरिक्त अन्य घटकांचा अधिकार मानला जात असे.वसिष्ठ आणि बौद्धायन धर्मसूत्रात हे सांगितले आहे . आपस्तंभांनी वेदांना असे कोणतेच अधिकार दिलेले नाहीत . काही निर्णय करण्याचा अधिकार मंडळाचे सभासदत्त्व मिळण्यासाठी वेदांचे ज्ञान ही पात्रता होती . मात्र वेद हे एकमेव प्रमाणम म्हटले जात नव्हते . विद्वत् मंडळाचे मत हाच हाच अंतिम निर्णय होता . ' गौतम ' सूत्रांच्या काळी वेदांचा अधिकार मान्य करण्यात आला . बौद्धायन कालात मात्र विद्वत मंडळाचा निर्णय हाच अंतिम निर्णय असे सांगितले आहे . शतपथब्राम्हणातील एका उताऱ्यावरूनही ही गोष्ट दिसून येते .

 संदर्भ -  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  लिखित

  RIDDLES IN HINDUISM  ( हिंदुत्वातील कुट प्रश्न )

      अनुवाद - लेखक डॉक्टर न. म. जोशी

भास्कर गायकवाड 

९८५०२४७६२१

       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.