वेदाचा उगम आणि वेदाच्या उगमाविषयी पुरावा.....

             

                  सर्व हिंदू लोक वेदांना त्यांच्या धर्माचा सर्वश्रेष्ठ पवित्र ग्रंथ मानतात. पण कुणालाही विचारा " वेदाचा उगम कसा झाला ? वेदाचे उत्पतीस्थान कोणते ?....  या साध्या सरळ प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना कठिण वाटते, एखाद्या वैदिक ब्राम्हणाला हा  प्रश्न विचारला तर तो ताडकन उत्तर देईल-
      " वेद सनातन आहेत "         
    पण हे मूळ प्रश्नाचं योग्य उत्तर नाही . सनातन म्हणजे नेमके कसे ? सनातन या शब्दाचा अर्थ काय ?
         मनुस्मृतीच्या पहिल्या अध्यायात श्लोक २२ व २३ मध्ये  कुल्लुक भटाने' सनातन ' या शब्दातील संकल्पना स्पष्ट केली आहे , कुल्लक भट्टाने सनातन शब्दाची व्याख्या खालीलप्रमाणे केली आहे . 
     “ चिरंतन , अनादि अनंत अस्तित्व म्हणजे सनातन होय ".
      वेद हे अपौरुषेय आहेत हे मनुस्मृतीने सांगितले आहे .   
         आधीच्या ऐहिक युगातले वेद सर्वज्ञ ब्रह्माच्या स्मृतीसाठी जतन केले गेले. हेच वेद , सध्याच्या काळात , अग्नि , वायू आणि सूर्य यांच्यापासून निघाले . या समजुतीला , कोणताही आधार नसला तरी कुणीही प्रश्न विचारायचा नाही . कारण वेदात म्हटलय..
       ऋग्वेद अग्नितून उत्पन्न झाला , यजुर्वेदाची निर्मिती वायू पासून झाली आणि सामवेद हे सूर्यनिर्मित आहेत .
         कुल्लक भट्ट यांचे विवेचन समजावून घ्यायचे तर आधी ' कल्प ' म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे . वैदिक ब्राह्मणांनी अनुसरलेली कालगणनापद्धती म्हणजे ' कल्प , त्यांनी कालविभाजन असे केले . १ ) वर्ष , २ ) युग , ३ ) महायुग , ४ ) मन्वंतर , ५ ) कल्प
          ' वर्ष ' ही संकल्पना समजायला सोपी आहे . वर्ष हे सध्याचे वर्षच होय . ' युग म्हणजे किती काळ याबाबत मात्र एकमत नाही . एक महायुग म्हणजे मात्र चार युगे . कृत , त्रेता , द्वापार आणि कली अशी ती चार युगे आहेत . चतुर्युगांचे चक्र एकापाठोपाठ सुरू असते . प्रत्येक नव्या महायुगाची सुरुवात कृतयुगाने होते . शेवट कलियुगाने होतो . .....
         महायुग आणि कल्प यांचे नाते कोणते ? ७१ महायुगांचे एक कल्प होते . महायुग आणि मन्वंतर यांबाबत मात्र निश्चित गणना पद्धती नाही . पण असे  सांगितले जाते की एक मन्वंतर म्हणजे ७१ महायुगे होत ; त्याशिवाय थोडा अधिक काळ त्यात मिळवावा लागतो . हा अधिक काळ किती हे मात्र कुणीही सांगितलेले नाही . 
        मन्वंतर आणि कल्प यांचे कालनिदर्शक संबंध कोणते हे स्पष्ट नसले तरी सध्या आपण कल्प म्हणजे काय याकडे लक्ष दिले तरी पुरेसे आहे .
 कल्प ही संकल्पना सृष्टीचा आरंभ व शेवट यांच्याशी निगडित आहे . विश्वाच्या निर्मितीला सृष्टी  म्हणतात ; विश्वनाशाला प्रलय म्हणतात . सृष्टी आणि प्रलय यांमधला काळ म्हणजे कल्प . वेदांच्या उगमाची कल्पना ही अशा तऱ्हेने कल्पकल्पनेशी निगडित आहे .
           कल्पाचा आरंभ म्हणजे निर्मितीचा ( सृजनाचा ) आरंभ . नवनिर्मितीची , सृजनाची ही प्रक्रिया अंमलात येत असतानाच वेदांची एक नवी मालिका आकारास येते . कुल्लकु - भट्टाला हेच दाखवून द्यायचं आहे की प्रत्येक नव्या कल्पाबरोबर नवे वेद जन्माला येत असले तरी ब्राह्मणांनी आपल्या स्मृतीच्या द्वारा जुनेच वेद जतन करून ठेवले . वेद हे सनातन आहेत या कल्पनेचा एवढाच अर्थ आहे . वेदाची निर्मिती केवळ स्मृतीतून आहे हेच कुल्लकु भट्टाला सांगावयाचे आहे . मुख्य प्रश्न तो हा की असे स्मृतीद्वारा जतन किंवा पुनर्निर्मिती कुणी केली ? प्रथम कल्पाच्यावेळी तरी वेदांची निर्मिती कोणी केली ? वेदांचा  शेवट नसला तरी आरंभ असलाच पाहिजे . ब्राह्मण नेमक्या शब्दात उघडपणे हे का सांगत नाहीत ?
                     वेदांच्या उगमासंबंधी अन्य शास्त्रांचा पुरावा - 
                  वेदांच्या उगमासंबंधी संशोधनाची सुरूवात वेदांपासूनच होणे योग्य आहे . वेदांच्या उत्पत्तीसंबंधी उपपत्ती ऋग्वेदात सांगितली आहे . प्रसिद्ध अशा पुरुषसूक्तात ती आहे .  पुरुष ( पुराण पुरूष ) एक दिव्य यज्ञ करतो आणि या यज्ञातून ऋग्वेद , सामवेद , यजुर्वेद यांची निर्मिती होते .
              सामवेद आणि यजुर्वेद वेदांच्या निर्मितीबद्दल काहीही सांगत नाहीत . अथर्व वेद मात्र वेदांच्या उगमासंबंधी सांगतो . अथर्ववेदात वेदांच्या उगमासंबंधी अनेक उपपत्ती मांडल्या आहेत . त्यातील एक उपपत्ती अशी . काळातून ऋग्वेदातील ऋचांची निर्मिती झाली आणि यजुर्वेदही काळातून निर्माण झाला ". 
             अथर्ववेदात यासंदर्भात आणखी दोन दृष्टिकोन मांडले आहेत . ऋग्वेद , सामवेद , यजुर्वेद यांची निर्मिती ' स्कंब ' पासून झाली , याबद्दल परस्परविरोधी विधाने त्यात आहेत . दुसरी उपपत्ती अशी की वेदांचा उगम इंद्रापासून झाला . 
            वेदांना त्यांच्या उगमाबाबत जे काही म्हणायचं आहे ते असं आहे . वेदांच्या नंतर क्रम आहे तो ब्राह्मणग्रंथांचा . याबाबत ब्राह्मण ( ग्रंथ ) काय म्हणतात ते पाहणेही महत्त्वाचे आहे . वेदांच्या उगमाबाबत ज्या ब्राह्मणग्रंथात उल्लेख आहेत ते असे : शतपथ ब्राह्मण , तैत्तिरीय ब्राह्मण , कौशीतकी ब्राह्मण .
          शतपथ ब्राह्मणातही विविध उपपत्ती आहेत . त्यातील एक अशी की वेदांचा उगम प्रजापतीपासून झाला . प्रजापती हाच जगनिर्माता . त्यानं इच्छा केली . ' अकोऽहम् , बरूस्याम् , ' त्यानं खडतर तप केलं .
        प्रजापतीने तप केल्यावर त्याच्यापासून पृथ्वी , वायू आणि आकाश यांची निर्मिती झाली . या तिन्ही जगांना त्यानं जिवंतपणा आणला . आणि मग त्यापासूनच अग्नी , वायू आणि सूर्य यांची निर्मीती झाली . मग यांच्यापासून तीन वेदांची निर्मिती झाली . अग्नीपासून ऋग्वेद , वायूपासून यजुर्वेद आणि सूर्यापासून सामवेद . तीन वेदांपासून भू , भूवः स्वः यांची निर्मिती झाली . ऋग्वेदाचा संबंध अध्वर्युशी आहे ; सामवेद ' उदगात्री ' आहे , ब्राह्मणांची कर्मे या तिन्ही वेदांच्या संयोगशास्त्रातून निर्माण झाली . ... 
       शतपथ ब्राह्मणांनी आणखी एक वेगळी उपपत्ती सांगितली आहे या उपपत्तीप्रमाणे वेदांची निर्मिती जलापासून झाली . शतपथ ब्राह्मणात म्हटलयं ... 
         " पुरुष अशा प्रजापतीने इच्छा केली की माझी वंशवृद्धी झाली पाहिजे . त्याने  तप केले . भक्ती केली . मग त्याने प्रथम तीन वेदांच्या रुपाने ज्ञाननिर्मिती  केली . ज्ञान हेच सर्व विश्वाच्या मुळाशी आहे . वेदांच्या अभ्यासाने मानवाला विशिष्ट बैठक प्राप्त होते . या ज्ञानाच्या आधारावर प्रजापतीने पुन्हा तप केले . त्यानं वाणीद्वारा जलाची निर्मिती केली . पृथ्वी जलमय झाली . प्रजापतीने तीन वैदिक शास्त्रांसह जलप्रवेश केला . मग जीवकवच निर्माण झाले . जगाची निर्मिती झाली . ज्ञानी माणसाला अग्निमुख असे वेदात म्हणतात . कारण ज्ञान हे अग्नीचे मुख होय . "
         शतपथ ब्राह्मणात तिसरी उपपत्ती दिली आहे . 
         “ मन हे सागरासारखं आहे . या मनसागरातून वाणीद्वारा परमेश्वराने तीन वेदांची निर्मिती केली . मन हे सागर ; वाणी हे तेजस्वी शस्त्र . त्याने त्रिवेदांना मनसागरातून बाहेर काढले . 
     ' तैत्तिरीय ब्राह्मणात तीन उपपत्ती सांगितल्या आहेत . वेदांचा उगम प्रजापतीपासून झाला ; तैत्रिरीय ब्राह्मणांत असेही म्हटले आहे की प्रजापतीने राजा सोम याची निर्मिती केली . आणि मग त्रिवेदांची निर्मिती झाली . 
         याच ब्राह्मणात प्रजापतीशी संबंध नसलेली आणखी एक उपपत्ती सांगितली आहे . वाणी ही एक अविनाशी गोष्ट आहे . ती वेदमाता आहे ; तो अमरत्वाचा केंद्रबिंदू आहे ." 
              शिवाय तैत्तिरीय उपनिषदांची आणखी एक उपपत्ती म्हणजे वेदांची निर्मिती प्रजापतीच्या हनुवटीतून - दाढीतून झाली . 
     उपनिषदांनीही वेदांच्या उगमाबाबत काही उपपत्ती सांगितल्या आहेत . 
              छांदोग्योपनिषदाने दिलेली उपपत्ती ही शतपथ ब्राह्मणाच्या उपपत्तीप्रमाणेच आहे . ऋग्वेद अग्नीपासून , यजुर्वेद वायूपासून , तर सामवेद सूर्यापासून झाला . 
                       बृहदारण्यकोपनिषदात दोन उपपत्ती मांडल्या आहेत . त्यांपैकी एक अशी ओल्या लाकडाच्या अग्नीपासून धूर निर्माण होतो तसे परमेश्वराच्या श्वासोच्छवासातून ऋग्वेद , यजु , साम हे वेद निर्माण झाले . एवढेच नव्हे तर  अथर्ववेद , श्लोक , इतिहास , पुराणे , उपनिषदे , शास्त्रे ही सर्व त्याच्याच  श्वासोच्छ्वासाची निर्मिती आहे .
     दुसऱ्या एका ठिकाणी याच उपनिषदात असे म्हटले आहे की ...
         " प्रजापतीने वाणीची निर्मिती केली ; त्यांतून आत्मा , अनेक इतर वस्तू , व वेद  यांची निर्मिती झाली . " 
     वाणी म्हणजे ऋग्वेद , मन यजुर्वेद , आणि श्वास म्हणजे सामवेद.
       आता मनुस्मृतींचा विचार करू . मनुस्मृतीत वेदांच्या उगमाबाबत दोन उपपत्ती सांगितल्या आहेत . वेदांची निर्मिती ब्रह्मापासून झाली . आणखी एका ठिकाणी वेदांची निर्मिती प्रजापतीपासून झाली असेही मनुस्मृतीत सांगितले आहे . प्रजापतीने वेदांच्या दोहनातून अ , , , शिवाय भू , भुवः , स्व , या अक्षरांची निर्मिती केली ..
       पुराणांचा विचार आता करावयाचा आहे . विष्णुपुराणात असे सांगितले आहे की , ब्रह्म्याच्या चतुर्मुखांपैकी एकेका मुखातून एकेका वेदाची व आणखी इतर गोष्टींची निर्मिती झाली . पूर्वमुखातून ऋग्वेद , पश्चिममूखातून सामवेद , दक्षिणमुखातून यजुर्वेद आणि उत्तरमुखातून अथर्ववेद !
                 भागवतपुराणाची उपपत्ती जवळपास याच प्रकारची आहे . वेदांचा उगम चतुर्मुख ब्रहम्यापासून झाला अस भागवतपुराण सांगते . 
            आतापर्यंत आपण वेदांच्या उगमाबाबत निरनिराळ्या अकरा उपपत्तींचा विचार केला.
 १ ) वेदांचा उगम पुरूष यज्ञापासून 
२ ) स्कंभस्थित वेदांचा उगम 
३ ) परमेश्वराच्या मुखातून वेदांचा उगम . 
४ ) इंद्रापासून वेदांचा उगम . 
५ ) ' काल ' हाच वेदांचा उगम .
 ६ ) अग्नि वायू , सूर्य यांपासून वेदनिर्मिती
 ७ ) प्रजापती आणि जल यांपासून निर्मिती . 
८ ) ब्रह्म्याच्या श्वासोच्छ्वासातून वेद निर्मिती . 
९ ) मनसागरातून देवांनी केलेली वेदांची निर्मिती . 
१० ) वाणीपासून वेदांची निर्मिती . 
११ ) ब्रहम्याच्या दाढीच्या केसापासून वेदांची निर्मिती .

 ' वेदांचा उगम कसा ' या एका प्रश्नाची ही गोंधळात टाकणारी अनेक उत्तरे हाच एक कूटप्रश्न आहे . ही उत्तरे ज्यांनी ज्यांनी सजविली ते सर्व ब्राह्मण आहेत . ते सर्व एकाच वैदिक परंपरेतले आहेत .प्राचीन धर्म ज्ञानाचे पुरस्कर्ते व पालक हे ब्राम्हणाच होते.मग त्यांनी एका सध्या प्रश्नाच्या उत्तरासाठी एवढा वैचारिक गोंधळ निर्माण का केला ?

संदर्भ -  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  लिखित
  RIDDLES IN HINDUISM  ( हिंदुत्वातील कुट प्रश्न )
      अनुवाद - लेखक डॉक्टर न. म. जोशी
भास्कर गायकवाड 
९८५०२४७६२१   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.