डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर आणि कला
दोहे,श्लोक गाणारे बाबासाहेब .......
सुभेदार रामजींनी घरात धार्मिक वातावरण निर्माण केले होते . त्यामुळे मुलांवर बालपणापासून धार्मिक संस्कार झाले होते . " सकाळी न्याहारी करण्यापूर्वी देवापुढे बसून मुलांनी ( भीम , आनंद वगैरे ) अभंग , भजने म्हणावीत अशी त्यांना शिस्त लावली होती.अभंग - भजन अर्धवट म्हणून मुले न्याहारीसाठी उठली तर ते त्यांना धमकावून विचारीत ' काय रे ! आज लवकर संपले तुमचे " आंबेडकरी चळवळीतील बळवंत वराळे यांच्या पत्नी सौ . राधाबाई वराळे आणि रमाबाईचे चांगलेच संबंध आले होते .आपल्या एका आठवणीत राधाबाई म्हणतात, “ रमाबाईंना कबीरांचे दोहे पाठ होते . पौर्णिमेच्या दिवशी त्या ' दोहे ' म्हणत असत . त्या दख्खनी भाषेत दोहे म्हणायच्या . आईसाहेब ( रमाबाई ) सांगत असत की , बाबासाहेबांच्या घराण्याचे दहीवलंगकर बुवा हे कबीरपंथीय गुरू होते . प्रत्येक पौर्णिमेला संध्याकाळी बाबासाहेबांचे वडील , मुले , सुना हे सर्वजण मिळून कबीराचे दोहे म्हणत असत .पुढील काळात बाबासाहेबांनी बुद्ध , फुलेंच्या जोडीला कबीरांनाही गुरू मानले आहे .
डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकदा आपल्या आठवणी कधी सभेतू कधी निकटवर्तीयांना गप्पातून सांगितलेल्या दिसतात . बळवंत वराळे यांनी बाबासाहेबांची एक आठवण सांगताना म्हटले , " ... बाबासाहेब म्हणायचे माझ्या वडीलांना वाटत असे की , आपल्या घरात नेहमी पूजा - अर्चा , भजन - पूजन चालत रहावे , त्याप्रमाणे आम्ही बहीण - भावंडे एकत्र बसून दररोज सकाळी - संध्याकाळी प्रार्थना म्हणत असू . रामदासाचे श्लोक , मोरोपंताच्य केकावली व कबीरांचे दोहे आम्ही म्हणत असू . काही श्लोक , केकावल्या दोहे आम्ही अगदी तोंडपाठ केलेले होते . वडीलांच्या अनुपस्थितीत आमच्या दंगामस्तीला मग कोणतीच मर्यादा नसे . पण वडील आल्याची चाहूल लागताच आम्ही अगदी शांत रहात असू . उलट मोठ्याने ओरडून प्रार्थना म्हणत असू आम्ही जणू काय प्रार्थना म्हणत होतो असेच वडीलांना भासविण्याचे प्रयत्न करीत असू . संध्याकाळी मात्र वडील नियमितपणे प्रार्थनेला हजर रहात घरातील सर्व मंडळींनी प्रार्थनेला हजर राहिलेच पाहिजे असा त्यांचा दंडक होता . माझे वडील कधी - कधी रामायण , महाभारत यांच्यातील एखादा अध्याय माझ्याकडून वाचून घेत असत ...
शां . शं . रेगे यांच्या मते “ डॉक्टर साहेबांनी ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास केला होता ... नामदेव , एकनाथ , तुकारामाचे अनेक अभंग त्यांना पाठ होते .प्रा . सत्यबोध हुदलीकर यांना मुलाखत देताना बाबासाहेब म्हणाले . " होते की , “ माझ्या इतका मराठी संतकवीचा सखोल अभ्यास केलेली फार थोड़ी माणसे असतील . "
बाबासाहेब १८ ऑगस्ट , १९४३ मध्ये मराठी भाषा व मराठी साहित्य या विषयावर बोलताना म्हणाले की , " यच्चयावत सर्व मराठी पुस्तके व ग्रंथ उद्या कोणी अरबी समुद्रात बुडवून टाकले किंवा जाळून टाकले तरी मला काहीही दुःख होणार नाही . फक्त दोन अपवाद एक तुकारामाची गाथा आणि दुसरी ज्ञानेश्वरी या दोन ग्रंथाच्या आधारे माझी मराठी ' यावश्चंद्र दिवाकरौ ' अभिमानाने व डौलाने जिवंत राहील . "
१६ ऑगस्ट , १९५६ रोजी चांद्याचे धर्मांतर घडवून आणल्यानंतर त्यांची तब्येत बरीच बिघडली . तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते ताजेतवाने दिसू लागले तेव्हा , " ... उत्साहाच्या भरात ते मोठमोठ्याने गाणी म्हणू लागले त्यात कबिरांचे दोहे होते ... अगदी शेवटच्या दिवशी देखील ते कबिरांचा दोहा म्हणत होते, म्हणजे "चलो कबीर तेरा भवसागर डेरा...." बाबासाहेबावर इतर महाराष्ट्रीयन संतापेक्षाही संत कबिरांचा प्रभाव जास्त होता.
बाबासाहेबाना अभंग,दोहे जसे आवडत होते तसे त्यांना अर्थपूर्ण भावगीते देखील आवडत असत.भालचंद्र वराळे म्हणतात ,"चांगले संगीत ऐकवयास मिळाल्यावर तल्लीन होणारे बाबासाहेब मी पाहिले आहेत..."बाबासाहेबाना 'तू नसतीस तर.......' हे गीत खूप आवडत असे.काही वेळा रंगात आल्यावर अगदी तालासुरात हे गीत आळवित असत..."
आयु.भास्कर गायकवाड
९८५०२४७६२१
Post a Comment