बाबासाहेबांनी अवगत केलेले.......संगीत ज्ञान -- - वादन -गायन......

बाबासाहेबांनी जीवनभर अतृप्त होऊन ज्ञान मिळविले . ज्ञान कोणतेही असो , ते आधाशीपणे त्यावर तुटून पडत . मात्र संगीत - वादन -गायन विशिष्ट वयानंतर अवगत होण्यास अवघड जाते . पण बाबासाहेबांनी त्यावर मात केली , असे दिसते .

अ ) तबला वादन 

बाबासाहेबांचे बंधू ' बाळाराम आंबेडकर हे फर्स्ट ग्रेनेडियर फलटणीत वादक होते .... वादकाचा व गायकाचा धंदा या सारख्या पेशावर उपजीविका करता - करता बाळाराम शेवटी मुंबई नगरपालिकेच्या एका खात्यात  कारकुनाच्या जागेवर स्थिरावले होते. अर्थात बाबासाहेबांना देखील वाद्य वादनाचा छंद होता, असे दिसते .' तबला ' त्यांना वाजविता येत होता.  
                  घनःश्याम तळवटकरांनी बाबासाहेबांची एक मनोरंजक आठवण सांगितली . ती त्यांनी बाबासाहेबांच्याच शब्दांत ऐकली होती . ती अशी , एक बुवा माझ्या बालपणी आमच्या वस्तीत कीर्तन करायचा . मला तबला वाजविण्याचा नाद होता . काळाकुट्ट रंग आणि भसाडा आवाज हे त्या बुवाचे वैशिष्ट्य . भसाड्या आवाजात तो गाणे गायचा आणि मी जमेल तशी तबल्यावर साथ देत असे . गाण्याचे एक कडवे म्हणून झाल्यावर बुवा मध्येच विचारायचा , क्यो भीमा ! कैसा गाता हूँ मै ? ' तबल्याचा ठेका न सोडता मी मान हलवून त्याला उत्तर देत असे की ' बहुत खूब । बहुत खूब ... ' " भीमरावाने वयाच्या बारा - तेराव्या वर्षीच आनंदरावाकडून तबला वाजविणाची कला हस्तगत केली . ते भजनात प्रसंगोपात तबला वाजवीत . "  बाबासाहेबांना बऱ्यापैकी ' तबला ' हे चर्मवाद्य वाजविता येत होते हे वरील संदर्भावरून स्पष्ट होते . 

ब ) सारंगी वादन 

               बाबासाहेब ठरावीकच विषय अभ्यासित असत असे नाही . जेजे आवडेल, शिकण्यासारखे वाटेल ते ते सर्व शिकण्याची त्यांची ज्ञानलालसा होती . ' गायन कला आणि वादन कला त्यांना खूपच आवडत असे .
            इ.स. १ ९३४-३५ सालची गोष्ट असेल बाबासाहेबांना वाटले ' सारंगी ' छेडण्याची कला हस्तगत करावी . सारंगी शिकविणाऱ्याचा त्यांनी  शोध घेतला........ दादर येथे वैद्य नावाचे एक गृहस्थ रहात होते . ते या कलेत निपुण   होते . त्यांना बोलविण्यात आले आणि कलेतील शिक्षक म्हणून त्याची नियुक्ती  केली . त्याच दिवशी सारंगी विकत घेण्यासाठी बाबासाहेबांनी त्यांच्याजवळ पैसे दिले . वैद्य रोज सकाळी राजगृहाला येत असत . ऑफीसला जाण्यापूर्वी  आठ - नऊ वाजेपर्यंत बाबासाहेब सारंगी छेडीत असत . श्री. बळवंत वराळे त्यांच्याजवळ  येऊन उभे रहात , पण त्या सारंगीच्या लयबद्ध आवाजात ते इतके हरवून जात असत , की श्री . वराळे आल्याचे त्यांना लक्षात येत नसे . बाबासाहेब बऱ्यापैकी सारंगी  वाजविण्यास शिकले होते . " 

क ) व्हायोलिन वादन 

             बाबासाहेबांना व्हायोलिन हे वाद्य खूपच आवडत असे . हे वाद्य आपल्याला वाजविता आले पाहिजे , अशी त्यांची तीव्र इच्छा होती . हे वाद्य मूळ भारतीय नाही . चर्चमध्ये हे वाद्य वाजवून ' प्रभू'ची आराधना ख्रिश्चन लोक करीत असत . बाबासाहेबांना या वाद्याची ओळख युरोपात झाली असावी . या वाद्याचे स्वर माणसाला भुरळ पाडतात . त्यामुळेच ' दिल्लीहून औरंगाबादला आले , तेव्हा येताना त्यांनी एक व्हायोलिन आणले होते . त्याचे धडे गिरविण्याचा ते रोज प्रयत्न करीत असत . 'बाबासाहेबांनी मुंबईत नाना व बाळ साठे या बंधुकडून  व्हायोलिनचे धडे घेतले होते . मुंबईतील चिखलवाडी भागात रहाणारे नाना आणि बाळू साठे  हे सख्खे भाऊ नाटकात ' संगीत ' देण्याचे काम करीत असत . 
            डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्यावेळी भारतीय मंत्रिमंडळात होते.उतारवयात या महामानवाला व्हायोलीन का शिकावेसे वाटले असेल ? तंतुवाद्यातून निघणारे सूर मनुष्याला ताण तणाव कमी करण्यास मदत करतात हे काही संगीत तज्ञाचे मट खरे असावे........  

आयु. भास्कर गायकवाड
        सोलापूर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.