महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष .......

 


शुद्ध बीजापोटी ........

                          महाराष्ट्रातलं प्रख्यात शहर आहे सातारा . एकेकाळी सातारा ही मराठ्यांची राजधानी होती . साताऱ्याला दोन गड ! अजिंक्यताऱ्याची सावली आणि सज्जन गडाचा सहवास सातारा नगरीला सतत लाभतो . साताऱ्याचा एक भाग आहे कैंप ! सातारा शहरातून कैंप भागाकडे आपण जाऊ लागलो की रस्त्याच्या डाव्या हाताला एक समाधी दिसते . समाधी साधीच आहे . लहानशी आहे . पण ती समाधी कुणाची आहे हे समजल्यावर मग ती साधी वाटणार नाही . ही समाधी आहे भीमाबाई आंबेडकर यांची . 

                             भीमाबाई आंबेडकर म्हणजे सुभेदार रामजी सकपाळ यांच्या पत्नी . भीमाबाई आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आई . एका महामानवाला जन्म देणाऱ्या आईची ती समाधी आहे . भीमराव केवळ सहा वर्षांचा असतानाच भीमाबाई देवाघरी गेल्या . 

                      भीमाबाई आंबेडकर या मूळच्या मुरबाडकर घराण्यातल्या . अठराशे पासष्ट साली रामजी यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला . रामजी सकपाळ हे मूळचे कोकणातले . रत्नागिरी जिल्ह्यात आंबावडे नांवाचं एक गाव आहे . मंडणगडापासून सुमारे पांच मैल अंतरावर असलेलं हे गाव . हेच आंबेडकर घराण्याचं मूळ गाव . सकपाळ घराण्याची कुलदेवता भवानी आई . भवानीच्या पालखीचा मान सकपाळ घराण्याचा .

                            रामजी सकपाळापर्यंत या घराण्यावर नाथपंथाचा पगडा होता . रामजीचे  वडील मालोजी हेही लष्करातच होते . लष्करातून ते निवृत्त झाले . त्यांची एक मुलगी मिराबाई आणि मुलगा रामजी .  रामजी नोकरीच्या वयाचा झाला . मालोजीनी त्याला आपलाच रस्ता दाखवला . रामजीनेही लष्करात नोकरी धरली.

                       त्या काळात शिक्षणाचा एवढा प्रसार झालेला नव्हता . एकोणिसाव्या शतकाचा शेवट विसाव्या शतकाची पहाट व्हायला आली होती . ' शिकलं पाहिजे ' असे कुणाला वाटत असूनही ' शिकायचं कसं ' हा प्रश्न उभा राहयचा , खेडयापाड्यात राहणाऱ्या मुलाला कुठे कुठे दूर जावं लागायचं , ही चांगल्या चांगल्याची कथा . मग अस्पृश्य माणसाला विचारतो कोण ? त्याला कुठलं आलय शिक्षण ? त्याला कुठली आलीय शाळा ? त्यांनी रस्ते झाडावेत, त्यांनी मैला डोक्यावरून वहावा ; त्यांनी मेल्या जनावराची कातडी सोलावी ; जोडे शिवावेत , गावाची ही अशी कामे करून पोटाला भाकर तुकडा मिळवावा , अशा परिस्थितीत शाळा कुठली अन शिक्षण कुठलं ? पण रामजीच्या सुदैवानं त्याला साथ दिली. वडील मालोजीराव लष्करातच होते.  त्याकाळी भारतावर ब्रिटिशांच राज्य होते . ब्रिटिशांचे सरकार म्हणजे मायबाप कंपनी सरकार पण या कंपनी सरकारनं एक चांगली सोय केली होती . लष्करी छावण्यांतून शाळा सुरू केल्या . या शाळांतून सक्तीचे शिक्षण देण्यास सुरुवात केली .या  शाळा फलटणीतल्या शिपायांच्या कामाच्या सोयीप्रमाणे सायंकाळी अथवा रात्री भरत . शिवाय आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे शिपायांच्या मुलांसाठी , मुलींसाठी दिवसाच्या शाळा असत . अशा एका छावणीतल्या शाळेत रामजी शिकू लागला . लहानाचा मोठा झाला . एवढंच नव्हे तर रामजीनं नोकरी धरली तीही फलटणीत , 

                         रामजी मालोजी सकपाळ लष्कराच्या सेवेत रुजू झाले . लष्करातल्या पद्धतीप्रमाणे बदल्या या ठरलेल्याच सुभेदार मेजर धर्मा मुरबाडकर यांची नेमणूक योगायोगाने याच पथकात झाली होती . सकपाळ आणि मुरबाडकर यांची ओळख झाली . ओळखीचे रूपांतर दृढ परिचयात झाले . मुरबाडकर कोकणचे , सकपाळ कोकणचे , धर्मा मुरबाडकर यांना भीमा नांवाची मुलगी होती . भीमाबाई वयात आली होती . रीतीप्रमाणे तिचं लम व्हायला हवं होतं . धर्मा मुरबाडकर जावयाच्या शोधात होते आणि त्यांना जावई सापडला , अगदी मनासारखा , रामजी सकपाळ यांना धर्माजीनी केव्हाच हेरून ठेवलं होतं ... पण ... मुरबाडकराच्या कांही कुटुंबीयांना रामजी सकपाळ  हा जावई म्हणून नको असे वाटत होते . मुरबाडकर हे सुभेदार मेजर रामजी साधा फलटणीतला सैनिक मुरबाडकरांची परिस्थिति सकपाळांपेक्षा कितीतरी उजवी. दर्जाचा प्रश्न आला . मुरबाडकरांच्या घरात कुरबूर सुरू झाली . धर्माजींचा निर्णय डावलणंही अवघड होतं . अखेर धर्माजींची निवड पक्की झाली .

                  धर्माजींनी रामजी सकपाळला विचारलं . त्यांनीही होकार भरला आणि १८६५ साली एका शुभमुहूर्तावर धर्माजी मुरबाडकरांची भीमाबाई , भीमाबाई रामजी सकपाळ झाली . त्या काळात लग्नं अगदी लहान वयात होत असत . नवऱ्या मुलाचं वय एकोणवीस तर नवऱ्या मुलींच तेरा ! भीमाबाई रंगानं गोरी होती . उठावदार होती .

                     रामजी सकपाळांच्या घरात ती आनंदानं नांदू लागली . माहेरची श्रीमंती आता मनाच्या कोपऱ्यात ठेवून सासरच्या श्रीमंतीची ती चिंता करू लागली . वडील आणि एक भाऊ यांना भीमाबाईचा हा संसार एकदम पसंत होता . पण बाकीचे नातेवाईक ' दरिद्री नवऱ्याची बायको ' म्हणूनच तिच्याकडे पहात . भीमाबाईही तडफदार होती . स्वाभिमानी होती . एवढ्या लहान वयातही तिची समज मोठी होती . तिनं माहेरच नांव टाकलं . कधीमधी माहेरीचा सांगावा आला तर जावं वाटायचं . पण मनाला आवर घालायची . एकदा तर तिनं निरोप पाठवला . " माझ्या स्वतःच्या घरी दागिने वाळत टाकण्याएवढी श्रीमंती आली म्हणजे मगच मी माहेरपणाला येईन . तोपर्यंत माझी वाट पाहू नका . 

                       अशा या तेजस्वी भीमाबाईचा संसार सुरू झाला .   भीमाबाई शेवटपर्यंत ' मानिनी ' म्हणूनच जगल्या . नवा संसार मांडलेला . उत्पन्न बेताचं . त्यातच महत्त्वाकांक्षा मोठी . अशावेळी ओढाताण व्हायचीच . पण भीमाबाईंनी संसारात कुठंही उणीव भासू दिली नाही . त्यातच भर पडली ती रामजींच्या बदलीची . रामजी फलटणीतले सैनिक खरे . पण कवायत आणि निशाणबाजीबरोबरच ते मैदानी आणि मर्दानी खेळ उत्तम खेळत . रामजींचं खेळातलं कौशल्य एका अधिकाऱ्याच्या ध्यानात आलं . त्यानं वर शिफारस केली . लष्करी शाळा चालवण्यासाठी चांगल्या शिक्षकाची लष्कराला आवश्यकता असे . त्यासाठी रामजींची निवड झाली . पुण्याच्या टीचर्स ट्रेनिंग स्कूलमध्ये पाठवणी करण्यात आली . रामजी पुण्याला , भीमाबाई मुंबईला , सांताक्रूझजवळ लष्करी छावणीच्या वसाहतीत . 

                   पुण्याहून रामजींकडून पैसे येत . तेवढ्या पगारात भागवणं म्हणजे मोठी कसरत होती . पैसे कमी पडत होते . मग भीमाबाई पदर बांधून उभ्या राहिल्या . त्यांनी चक्क रस्त्यावर खडी टाकण्याचं काम पत्करलं . गरज भागू लागली .

               १८६५ साली लग्न झालं . १८ ९ ० सालापर्यंत भीमाबाईना तेरा मुले झाली . पण त्यातली जगली सहाच . बाळाराम आणि आनंदराव हे मुलगे !  गंगाबाई ,  रमाबाई , मंजुळा आणि तुळसा या मुली .  याच काळात रामजी लष्करी छावणीच्या शाळेवर बदलून गेले . तिथं ते मुख्याध्यापकही झाले . एकंदर चौदा वर्ष त्यांनी लष्करी शाळेत काम केलं . त्यांना सैनिकी पथकातही बढती मिळाली . सुभेदार मेजर या हुद्यापर्यंत ते पोचले . पूर्वीच्या आणि मग भीमाबाईचं सासरी - माहेरी येणं वाढू लागलं . मानानं आता परिस्थिति सुधारली . सासऱ्याच्या पंगतीला जावई येऊन बसला. 

              लष्करातल्या नोकरीमुळं रामजी सुभेदार यांच्या सतत बदल्या होत . विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर अशी स्थिति असे . सामानाची जुळवाजुळव आणि हलवा हलव , प्रत्येक ठिकाणी नवा संसार मांडायचा . मुंबईच्या जीवनात उपसलेले कष्ट , नंतरची बाळंतपणं आणि प्रत्येक गावी बदलणारं हवापाणी यामुळं भीमाबाईच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला . अनेक दिवसांपासून प्रकृतीच्या लहानमोठ्या तक्रारी सुरूच होत्या . औषधपाणी सुरू होतं . डॉक्टर , वैद्य यांना दाखविलेलं होतं . पण निश्चित निदान कुणालाच होत नव्हतं . भीमाबाई सारं सोसत होत्या . आणि मग सुभेदार मेजर रामजींची बदली झाली महूला . मध्यप्रदेशात प्रख्यात इंदूर शहराजवळ महू इथं एक लष्करी छावणी होती . महूची हवा भीमाबाईना बरी वाटली . अठराशे नव्वद सालचा सरता महिना होता . भीमाबाई गर्भवती होत्या . त्या सुमारास एक गंमतीची घटना घडल्याचे सांगतात . 

                     रामजी सकपाळ यांचा एक काका बैरागी झाला होता . कोकणातल्या घरातून तो केव्हाच निघून गेला होता . गेली कितीतरी वर्षं त्याचा ठावठिकाणा नव्हता आणि एक दिवस रामजीला कुणीतरी सांगितलं की महूला साधुबैराग्याचा एक मोठा मेळा आला आहे . ही बैरागीमंडळी रोज नदीवर स्नानाला जात . रामजी सकपाळ यांच्या घरी एक नातेवाईक स्त्री मदतीला आली होती . तिला हा रामजीचा चुलता माहित होता.तिनं नदीवर जातांना बैराग्याला पाहिलं ओळखलं आणि तडक येऊन रामजीला सांगितलं ... 

         “ तुझा बैरागीकाका इथं आलायू . '

           रामजी तडक बाहेर पडले . त्यांनी त्या बैराग्यांच्या जथ्यावरून नजर फिरवली आणि ज्या काकाला त्यांनी कधीही पाहिलं नव्हतं त्याला केवळ आधी ऐकलेल्या वर्णनावरून , अंदाजानं ओळखल . नमस्कार झाला . आशीर्वाद मिळाला . बैरागीबुवांना घरी येण्याचा आग्रह झाला . पण छे : बैराग्याला कुठलं घर नू कुठले नातेवाईक . बैरागीबुवांनी घरी यायला नकार दिला . अनिच्छेनंच रामजी उठले . तेव्हा मात्र क्षणभर गंभीर होऊन नंतर प्रसन्न मुद्रेनं बैरागीबुवा म्हणाले .

                   " जा बेटा . सुखानं घरी जा . लवकरच तुझ्या घरात नवा अवतार होणार आहे . तुला होणारा मुलगा सुपुत्र असेल . तो तुझं नांव करील . कर्तबगार मुलाचा बाप होशील तू . " निःसंग बैरागी चुलत्याचा हा आशीर्वाद मिळताच रामजी मनोमन सुखावले .

                   बैरागीकाका घरी आले नाहीतच . पण जाताजाता , घरी न येता , घराला आनंद देणारा शुभाशीर्वाद ते देऊन गेले . 

           ही कथा दंतकथा वाटण्याइतकी आश्चर्यकारक आहे . पण नंतर ती खरी ठरली . तेव्हा दंतकथेलाही सत्यकथेचं रूप आलं आणि बैरागीकाकांची भविष्यवाणी खरी ठरली . 

        चौदाव्या वेळी भीमाबाई गर्भवती होत्या . अठराशे एक्याण्णव साल महिना एप्रिल दिवस तसे कडक उन्हाळ्याचे.अंगाची लाहीलाही होत होती. लष्कराच्या नोकरीत रामजींचा दिवस कसा जात होता ते अखंड कामामुळं समजतही नव्हतं . भीमाबाईचा प्रसूतीकाल जवळ आला होता . रामजींची बहीण मदतीला आली होती . भीमाबाईंना कधी एकदा हा भार हलका होतो असं झालं आणि ....

               १४ एप्रिल १८ ९ १ रोजी ...

               भीमाबाई प्रसूत झाल्या . 

            सकपाळांच्या घराण्यातलं चौदावं बाळ जन्माला आलं . बाळाचं नांव ठेवण्यात आलं भीम . आत्याबाई कधीकधी कौतुकानं त्याला भिवाही म्हणायच्या . आत्या मीराबाई ही रामजी सुभेदारांची वडील बहीण . तिचं लग्न झालं होतं . पण तिला सासरी वागणूक चांगली मिळेना . म्हणून ती घरीच , माहेरी येऊन राहिली होती . ती बरेच बेळा रामजींकडंच असे . थोरली बहीण म्हणून तिचा वचक चांगला असे . 

            भीम अडीच वर्षांचा झाला आणि रामजी सुभेदारांची लष्करातली नोकरी संपली . ते सेवानिवृत्त झाले . मग त्यांनी बिऱ्हाड उचललं आणि ते थेट आपल्या गावी , कोकणात काप - दापोलीला गेले . काप - दापोली कोकणातला लहानसा टुमदार गाव ! या गावात जमातीच्या मंडळींची वस्तीही चांगली . तुटपुंज्या निवृत्तीवेतनात मोठ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा तर गावीच राहिलेलं बरअसा विचार रामजी सुभेदार यांनी केला . आनंदाला त्यांनी काप - दापोलीच्या प्राथमिक शाळेत घातलं . कांही दिवसांनी छोटा भीमही त्याच्या बरोबर शाळेत जाऊ लागला . काप - दापोलीच्या शाळेत भीमाच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला . बाकी सारं ठीक असलं तरी केवळ पन्नास रुपयात चार - सहा कच्च्याबच्च्यांचा संसार चालवणं अवघड वाटू लागलं . कांहीतरी उद्योग करायला हवा , एखादी नोकरी शोधायला हवी असं रामजी सकपाळांना वाटू लागलं  त्यासाठी त्यांची धडपड  सुरू होती . 

                          खरं तर निवृत्त आयुष्य म्हणून गावात त्याचं बरं चाललं होतं . पहाटे उठावं , स्नान करून स्तोत्रे , भजने , दोहे , अभंग , भूपाळ्या म्हणाव्यात . पूजा करावी , अखंड नामसंकीर्तनात वेळ घालवावा . मुलांना शिकवावं ... असा कार्यक्रम सुरू होता . पण कमाई बेताची , शिवाय मुलांच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न होताच आणि तेवढ्यासाठीच रामजींच्या जिवाची  घालमेल होत होती . काप - दापोलीतील शांत जीवनक्रम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता . कांहीतरी करायला हवं असं सारखं वाटत होतं . 

                              मग एक दिवस रामजींनी सरळ मुंबई गाठली . मुंबईत रोजगार भरपूर . काम करणाऱ्याला काम आणि त्याचा दाम मुंबईत मिळतो यांची रामजींना माहिती होती . त्यांच्या ओळखीही भरपूर होत्या . एकदोन ठिकाणी जाऊन सांगितलं . हेलपाटे घातले आणि मग त्यांना नोकरी मिळाली . नोकरी होती साताऱ्याला . रामजींनी लगेच होकार भरला . मग भीमाबाई , मुलं , सगळी साताऱ्यात दाखल झाली . सातारा शहरात जागा मिळणंच शक्य नव्हतं . सातारा कैंप भागात त्यांना एक जागा मिळाली . तिथं बिऱ्हाड मांडलं . आंनदराव आणि भीमराव यांच शिक्षण साताऱ्याच्या लष्करी छावणीच्या शाळेत सुरू झालं . 

                        भीमाबाईंच्या प्रकृतीची अवस्था इथं कांहीशी बिघडली . संसाराचा भार पेलता पेलता मोठीच कसरत करावी लागत होती . भीमाबाईंना आता डोकेदुखीचा त्रास  वाटायचा . पुन्हा आपले पहिले पाढे पंचावन्न . मनस्वी त्रास होत होता . डॉक्टर , वैद्यांची औषध सुरू होती . पण तात्पुरता आराम मिळायचा . रामजीही भीमाबाईंना संसारात मदत करीत होतेच . रामजी मूळचे नाथपंथी , पण आता तर त्यांनी कबीरपंथाची दीक्षा घेतली . ते पूर्ण शाकाहारी बनले . नामोच्चारण सतत होऊ लागले . नोकरी आणि घरची कामं यात त्यांचा सर्व वेळ जाई . पण कबीरपंथी रामजी हे सर्व शांतपणे करीत होते .चालत्या गाड्याला खीळ घालणाऱ्या घटना आता घडत होत्या . 

                      सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यात दुष्काळ पडला . कांही गावं तर दुष्काळानं पार त्रस्त  झाली होती . सरकारनं अशा भागांत दुष्काळी काम सुरू केली होती . गोरेगाव , मायणी , माहुली इथल्या कामावरच्या लोकांचे पगार देण्याचं काम रामजींकडे आलं . आता ते कॅशियर बनले आणि जबाबदारी वाढली . साता-यात  राहून हे काम पार पाडता येण्यासारखं नव्हतं . मग रामजी एकटेच तिकडे  गेले . मुलं आणि भीमाबाई साताऱ्यातच होते.

                 भीमाबाईंच्या डोकेदुखीनं आता चांगलंच उग्र स्वरूप धारण केलं होतं . रात्री झोप नसे . आनंदा , भिवा , मीराबाई सगळे सेवेला असत . पण आतल्या दुखण्यानं एवढी उचल खाल्ली होती की बाहेरच्या सेवेने आराम मिळत नव्हता . 

              एक रात्री तर कहरच झाला . रात्रभर भीमाबाई तळमळत होत्या . मग रामजींना सांगावा गेला - भीमाबाईंना आताशा भूकही कमी लागत असे . प्रकृती क्षीण झालेली . अन्न कमी आणि कमालीची डोकेदुखी ... भीमाबाईंची प्रकृती आता जास्तच बिघडली . ही नेहमीचीच डोकेदुखी आहे असं सर्वांना वाटलं , तरी पण सांगावा गेलेलाच होता . रामजी सकपाळ तातडीनं आले . डॉक्टरांना बोलावलं . औषधं दिली . तात्पुरता आराम वाटला . पण पुन्हा मस्तकशूळानं उचल खाल्ली आणि भीमाबाईंचा आजार बळावला . रामजींना येऊन उणेपुरे तीन दिवस उलटले होते . त्यांनी गोरेगावला कामाला येत नसल्याबद्दल निरोप पाठवला आणि भीमाबाईंच्या प्रकृतीला आराम पडेल म्हणून ते वाट पहात बसले . पण छे , चौथा दिवस उजाडला . सकाळची वेळ . भीमाबाईचे डोळे खोल गेले होते . त्यांच्या तोंडून शब्दही फुटेना . आवाज खोल गेला होता . त्यांनी खुणेनंच सर्व मुलांना जवळ बोलावलं . मुलं आईच्या बिछान्याभोवती गोळा झाली . पिल्लं पक्षिणीची अवस्था पहात होती . सर्वांचे डोळे पाणावले होते . रामजी समोर भिंतीला टेकून उदासवाणे बसले होते . भीमाबाईंनी मुलांना आणखी जवळ बोलावलं . प्रत्येकाला डोळा भरून पाहून घेतलं . भिवाला - भिमाला जवळ बोलावलं . आणि प्रेमभरानं त्यांच्या पाठीवरून हात फिरवला . सर्वांना हुंदके आवरेनासे झाले . आणि .... 

                  भिवाच्या पाठीवरून आईचा हात ... अचानक ... फांदी गळून पडावी तसा गळून पडला . 

            दिवसा ढवळ्या त्या घरात अंधार झाला . रामजींचे हुंदके , चिमण्या जीवांचा आकांत यांनी आसमंत भरून गेला . शेजारीपाजारी जमले . गणगोत जमले आणि सातारा शहराच्या कॅम्प भागातच रस्त्याच्या कडेला भीमाबाईंचा अंत्यविधी उरकण्यात आला .  आपल्या डोईवरचं आकाश फाटलं असं रामजी सुभेदारांना वाटलं . मुलांनी तर रडून रडून आकांत मांडला होता . भिवा आता पोरका झाला होता . आनंदाची आई देवाघरी गेली होती . आता मुलांचा सांभाळ रामजी सुभेदारांनाच करावयाचा होता .

            ही घटना १८ ९ ६ मधली . 

       बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १८९१ मधला . 

                    म्हणजे त्यावेळी बाबासाहेब फक्त पांच वर्षांचे होते . पांचवं संपून नुकतंच सहावं वर्ष लागलं होतं . रामजींना आता घर खायला उठे . मुलांचा सांभाळ करायला मीराबाई होत्या . पण आई आणि आत्या ... मुलांना आई हवी असते . ती गेली ; आत्या जरा कडक होती . शिस्तीची होती . रामजी सुभेदारांना हा सगळा भार पेलणं आता अवघड जात होतं . पण इलाज नव्हता . मुलांची शिक्षणं होणं आवश्यक होतं . शिक्षणाचं महत्त्व रामजी सुभेदारांना पटलेलं होते . ते स्वतः लष्करी शाळेत चौदा वर्ष शिक्षक होते . आपल्या मुलांना ' शिक्षण ' हेच उत्कर्षाचे महत्त्वाचे साधन आहे हे रामजींनी मनोमन जाणले होते आणि त्यासाठीच त्यांची धडपड सुरू होती . अस्पृश्य समाजाला जगावं लागणारं यातनामय जिणं आणि भोगाव्या लागणाऱ्या यातना रामजी पहात आले होते . रामजी पलटणीतले सैनिक असले तरी विचार करणारे होते . डोळे उघडून पाहणारे होते . अस्पृश्याचा स्पर्श तर राहोच पण त्याची सावलीसुद्धा विटाळाचे कारण ठरत होती . सवर्णांची गुलामगिरी करावी लागत होती . कुत्रा - मांजर , गाय - म्हैस या प्राण्यांना जे जवळ करीत तेच अस्पृश्य चार हाताच्या अंतरावर ठेवीत . अस्पृश्य माणूस पाण्यालासुद्धा महाग होता . अस्पृश्य आणि शिक्षण यांचा तर जणू संबंधच नव्हता . पण इंग्रजी राजवटीत अस्पृश्यांच्या जीवनातल्या काळ्याकुट्ट अंधाराचा गडदपणा हळूहळू कमी होऊ लागला . अस्पृश्यांच्या जीवनात पहाट उगवणार असल्याची पदचिन्हे दिसू लागली . शुभलक्षणे दिसू लागली .

                        महात्मा ज्योतीराव फुले यांनी पुण्याच्या पूर्वभागात शाळा काढून जणु शैक्षणिकक्रांतीच केली होती . स्त्रियांसाठी पहिली शाळा ज्योतीरावांनीच सुरूकेली . त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले स्वतः शिकून मग मुलींना शिकवू लागल्या . महात्मा फुले आणि रामजी सुभेदार यांचा परिचय होता . ज्योतिबांच्या विचारांचा परिचय रामजी सुभेदार यांना झाला होता . त्यामुळेच मुलांच्या शिक्षणाबाबत ते जागरूक होते . मुलांमध्ये विद्येची आवड उत्पन्न व्हावी , त्यांचे चारित्र्य चांगले व्हावे , त्यांची प्रगती व्हावी याची सतत ओढ रामजींना असे . त्यासाठी त्यांनी स्वतः एक जीवनक्रम आखून घेतला होता . मुलांनाही आखून दिला होता . सकाळची न्याहारी करण्यापूर्वी सर्वांनी मिळून देवापुढं बसावं , अभंग म्हणावेत , भजनं म्हणावी आणि मगच न्याहारी घ्यावी अशी त्यांची सक्त आज्ञा होती . या कार्यक्रमात फक्त आजारी असेल तरच सवलत . रात्रीच्या भजनाच्या वेळी तर सर्वांनी उपस्थित राहिलेच पाहिजे असा कडक नियम होता . आईच्या पश्चात मुलांना वळण चांगले लागावे यासाठीच सर्व नियम होते . मृत्युसमयी बळावलेल्या घशाच्या व डोकेदुखीच्या विकारानं भीमाबाई अकाली गेल्या . तेव्हा ते दुःख सहन करण्या बरोबरच ' मुलांचे भवितव्य ' हा मोठा प्रश्न रामजींच्या पुढे उभा होता . 

                   भीमराव आपल्या आईला ' बय ' म्हणत असे . आता त्याला ठायीठायी बयची आठवण  येऊ लागली . रामजींच्या कडक नियमांमध्ये कुठंतरी मायेचा ओलावा हवाच होता . थोर वयात एकदा डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनीच सुप्रसिद्ध चरित्रकार धनंजय कीर यांना सांगितले होते " “ माझी पत्रिका केलेली नाही . पण माझ्या वडिलांना ज्योतिषशास्त्र अवगत होते . ते माझ्या भवितव्याविषयी फार आशादायक गोष्टी बोलत असत . त्यांच्या एकंदर व्यवस्थित नि नियमबाह्य जीवनामुळे असे म्हणता येईल की , त्यांनी शाळेत जी माझी जन्मतारीख दिली आहे तीच खरी असली पाहिजे . ( डॉ . बाबासाहेब आंबेडकर : धनंजय कीर : १ ९ ६६ पृ . १५ ) . बयच्या मृत्यूनंतर रामजींचा सारा भार भीमावर होता . रामजींना ज्योतिष शास्त्राचा नाद होता . रामजी आपल्या पत्नीला , भीमाबाईंना सांगत " अगं , हे पाहिलंस का ... भीमाचा चेहेरा बघ .... त्याचे तळपाय बघ ; तळव्यां- वरच्या या रेघा बघ . आपला हा मुलगा कुणीतरी मोठा होणार . खूप खूप कीर्ति मिळवणार .... भीमाबाईला समाधान वाटे . मुलानं खूप कीर्ति मिळवली . पण ती बघायला त्या मुलाची आई .... बय ... नव्हती . ती केव्हाच देवाघरी निघून गेली होती . भीम आता चांगलाच अवखळ झाला होता . बय तर नव्हतीच . आत्या मीराबाईच सांभाळ करीत होती . पण मीराबाईलासुद्धा सगळी मुलं मिळून नको नको करीत . ती कधी कधी रागावे . गोरागोमटा कुरळ्या केसांचा भीम सर्वांचा लाडका होता . तो कांहीसा लाडावलेलाही होता . लहानपणापासूनच भीमाची स्वतंत्रवृत्ति , स्वाभिमानी स्वभाव , याचा प्रत्यय रामजींनाही आला . 

                  मीराबाईंची होणारी ओढाताण रामजींना पाहवत नव्हती . म्हणून इच्छा नव्हती तरीही त्यांनी दुसरा विवाह करायचं ठरवलं . शिरकावळे नांवाचे एक सेवानिवृत्त जमादार होते . त्यांची जिजाबाई नांवाची बहीण होती . जिजाबाई विधवा होती . तिलाही आधार हवा होता . रामजींनी जिजाबाईशी लग्न केलं . घरात सावत्र आई आली आणि छोट्या भिवाला मनस्ताप होऊ लागला . जिजाबाई भीमाबाईचे कपडे वापरायची ; भीमाबाईचे दागिने ती घालायची . “ बयेचे दागिने घालणारी ही कोण बया ! ” असाच भाव भिवाच्या चेहेऱ्यावर उमटायचा आणि आपली सावत्र आई भिवाला आवडत नाही याची जाणीव रामजींना होऊ लागली . पण आता त्यांचाही इलाज नव्हता . असे असले तरी रामजींनी मुलाकडे दुर्लक्ष कधीच केलं नाही . उलट मुलांच्या शिक्षणासाठी पडतील ते कष्ट उपसण्याची त्यांची तयारी होती . 

                 कांही दिवसांनी मुंबईला शिक्षणासाठी बिऱ्हाड हलवल्यावर रामजी स्वतः मुलांसाठी जागरण करीत . त्यांना अभ्यासाला लवकर उठवत आणि मग स्वतः झोपत .

                  डॉ . आंबेडकर यांच्या पुढील उत्तुंग जीवनाचा पाया त्यांच्या माता - पित्यांनी अशा तऱ्हेने लहानपणीच घातला होता . 

                करारी , उद्योगी , स्वाभिमानी , वत्सल , संसारदक्ष अशी आई भीमाबाई ... 

               दीर्घोद्योगी , शिक्षणप्रेमी , समाजमनस्क , भजनशील , कर्तव्यकठोर , जागरूक असे वडील रामजी .

        भीमाबाई आणि रामजी हे दोघे बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मदाते नव्हते तर त्यांच्या भावी जीवनाचे शिल्पकार होते . त्यांनीच भारताला घटनेचा शिल्पकार दिला .



           सर्व भारतीयाना क्रांतिसूर्य, भारतीय  घटनेचे शिल्पकार,परमपूज्य   महामानव डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

  भास्कर गायकवाड............................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.