बाबासाहेबांची गाण्याची आवड आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्याची घेतलेली फिरकी .......

          बाबासाहेबांची गाण्याची आवड आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्याची घेतलेली फिरकी .......

             वेळ मिळाल्यास बाबासाहेबांना कार्यकत्यांकडून गाणी ऐकायला आवडत असे . बाबासाहेब कधीकधी आपल्या मंडळींची फिरकीही घेत असत श्री. बळवंत वराळे यांनी एक आठवण सांगितली . इ.स. १९३८ साली मुंबई विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुण्याला सुरू होते आम्हा सर्व स्वतंत्र मंजूर पक्षाच्या आमदारांना * बाबासाहेब म्हणाले , “ कार्ल्याची बौद्ध लेणी अत्यंत पाहण्यासारखी आहे . " ... लेणी पहावयास आमची सहल निघाली ... रस्त्यातच बाबासाहेबांनी आम्हाला फर्मावले की , " तुम्हाला कोणाला गाता येत असेल तर आळीपाळीने आपापली गाणी म्हणून दाखवा . " बाबासाहेबांच्या या चकीत करणाऱ्या आदेशामुळे आम्ही सर्वजण बुचकळ्यात पडलो . कारण की आमच्यामध्ये गाणारी मंडळी कोणीच नव्हती . त्यामुळे गाणे म्हणणे कोणासही जमत नव्हते . 

           


शेवटी बाबासाहेबांनी माझे मित्र श्री. एस . के . सावंत यांना गाणे म्हणावयास सांगितले . पण सावंतांची गडबड उडाल्यामुळे गाणे म्हणावयास काही केल्या येईना . तेव्हा बाबासाहेबांनी एका तेल्याच्या मुलाची मजेशीर गोष्ट सांगितली . ती अशी की , " ... एका तेल्याला एकुलता एक मुलगा होता . घाण्याचे काम तो मुलगाच करी. त्याला गाणी म्हणायचा फार हव्यास होता . गाण्यावर त्याचे प्रभुत्व होते . घाणा सुरू असताना घाण्याच्या दांडीवर पालथा पडून तो सारखे गाणे म्हणायचा पालथे पडून त्याला गाणे म्हणण्याची सवय होती . एके दिवशी त्या शहरामध्ये गाण्याची स्पर्धा  होती आपल्या मुलाने जर या बैठकीत भाग घेतला तर निश्चित त्याला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळेल , अशा प्रकारची खात्री त्या तेल्यास वाटली . म्हणून त्याने आपल्या मुलाचे नांव त्या गाण्याच्या  स्पर्धेत  नोंदविले . ठरलेल्या दिवशी हे दोघे बापलेक गाण्याच्या स्पर्धेस गेले . स्पर्धा सुरू झाली . थोड्याच वेळात तेल्याच्या मुलाची पाळी आली त्याच्या बापाने त्याला गाणे म्हणावयास सांगितले . बराच वेळ झाला तरी तो मुलगा गाणे म्हणेना आपल्या मुलास गाणे काही जुळेना व म्हणायचे काही जमेना म्हणून शेवटी चिडून बापाने आपल्या मुलास एक जोराने लाथ मारली . लाथेचा मार बसल्यामुळे तो मुलगा पालथा पडला त्याचा बाप तर हताश झालाच होता , पण काय चमत्कार ? मुलगा पालथा पडल्याबरोबर सुरेल आवाजात त्याने गाणे म्हणावयास सुरुवात केली . " एवढे सांगून बाबासाहेब पुढे म्हणाले की , " गाणे म्हणणाऱ्याला एक प्रकारची पोझ हवी असते , त्याप्रमाणे तेल्याच्या मुलाला पालथे पडूनच गाणे म्हणण्याची सवय झाली होती . बापाच्या लाथेमुळे त्याला हवी तशी पोझ मिळाली आणि त्याचे उत्कृष्ट गाणे सुरू झाले .... " 

                ही गोष्ट संपल्यानंतर सावंताना बाबासाहेब म्हणाले , " ... तुला पोझ हवी आहे काय ? " यावेळी आम्ही खूप खूप हसलो . शामराव भोळे यांनी फळांनी भरलेली एक करंडी घेतली होती , ती त्यांनी काढली आणि सर्वांना वाटली बाबासाहेब म्हणाले , " आता तुम्हाला गाता येत नाही , तर खाता तर नक्कीच येते , तेव्हा शामरावने आणलेली फळे आपण खाऊ या .. ' " ***

भास्कर गायकवाड

सोलापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.